‘प्रहार’च्या दणक्याने साईसंस्थानच्या कर्मचार्यांची वेतन कपात रद्द
‘प्रहार’च्या दणक्याने साईसंस्थानच्या कर्मचार्यांची वेतन कपात रद्द
नायक वृत्तसेवा, राहाता
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील आरोग्य सेवेतील कंत्राटी कामगारांच्या वेतन कपात निषेधार्थ झालेल्या रक्तदान घंटानाद आंदोलनाला यश मिळाले आहे. आरोग्य सेवेत काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांवर लावलेली 40 टक्के अन्यायकारक पगार कपात रद्द करण्यास प्रहारने भाग पाडले आहे. तसेच प्रत्येक कर्मचार्याला सुमारे पन्नास लाख रक्कमेचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
प्रहारच्या वेळोवेळीच्या पाठपुराव्याने साई संस्थानने कोविड संदर्भात सेवा देणार्या तब्बल 466 कंत्राटी कामगारांची चाळीस टक्के वेतन कपात मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय साई संस्थान तदर्थ समितीने घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे. समितीने नुकतीच चक्रीय पद्धतीने या विषयाला मान्यता दिली आहे. यामुळे संस्थानचे कोविड रुग्णालय व त्या संदर्भात सेवा देणार्या 466 कर्मचार्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. याकामी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे, जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, अहमदनगर जिल्हा पदाधिकारी अभिजीत कालेकर, अभिजीत पाचोरे, कृष्णा सातपुते, माजी सैनिक सांगळे, संजय वाघ, राहाता तालुकाध्यक्ष दिनेश शेळके, नितीन भन्साळी, सोमनाथ लांडे, अवि सनासे, रोमचंद कडू, भाऊनाथ गमे, विजय काकडे, विजय साळवे, उमेश बडगुजर आदिंनी पाठपुरावा केला.