सहाणे मास्तर म्हणजे कामगार विश्वातील कर्मवीर : मालपाणी कामगार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या पाच जणांचा पुरस्कार देवून सन्मान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवंगत कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत कामगारांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करणारे कर्मवीर होते. त्यांनी हजारो कामगारांचे नेतृत्व केले. संघर्षाऐवजी समन्वयाच्या भूमिकेवर त्यांचा अधिक भर होता. त्यामुळेच कामगारांच्या परिवारांनाही उज्ज्वल भवितव्यासाठी दिशा दाखवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी केले.

दिवंगत कामगार नेते कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य तंबाखू कामगार महासंघ व कॉम्रेड सहाणे मास्तर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाच्या मंचावर मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, महाराष्ट्र राज्य विडी कामगार सभेचे अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, कॉ. ज्ञानदेव सहाणे, कामगार नेते कॉ. माधव नेहे, कॉ. सुभाष कडलग, कॉ. शांताराम वाळुंज आदी उपस्थित होते.

यावेळी कामगारांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या कॉ. कारभारी उगले यांना विशेष समाज सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर, सोमनाथ वडतल्ले यांना कामगार क्षेत्रातील विशेष पुरस्कार, संजय परदेशी यांना यूनियन कार्यकर्ता पुरस्कार, सविता अशोक भंडारी आणि नवनाथ वावरे यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश मालपाणी यांनी उद्योग समूहातील व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांचा सविस्तर आढावा घेतला. 1988 नंतर मागील 35 वर्षात मालपाणी उद्योग समूहामध्ये एकही संप झाला नाही, ही गोष्ट मालक आणि कामगार यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी पुरेशी आहे असे ते म्हणाले. संवादाने प्रगती होते संघर्षाने होत नाही हे दोन्ही बाजूंना पटल्यामुळे हातात हात घालून आजवरची वाटचाल यशस्वी झाली आहे. मालपाणी उद्योग समूहाने नेहमीच कामगार कल्याणाचे धोरण अवलंबले आहे. त्यातूनच शासनाचे सहकार्य नसतानाही कामगारांच्या घरकुलांचे प्रकल्प साकारले गेले. कामगारांच्या मुला-मुलींनी दैदीप्यमान शैक्षणिक प्रगती करून आपल्या माता-पित्यांच्या कष्टाचे चीज केले असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

मनीष मालपाणी यांनी कॉ. पंढरीनाथ सहाणे मास्तर हे म्हणजे योगी पुरुष होते अशा शब्दांत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. टाळेबंदीच्या काळातही मालपाणी उद्योग समूहाने कामगारांना दूर लोटले नाही, त्यांची सर्वार्थाने काळजी घेतली. त्यामुळे टाळेबंदीनंतर उद्योग समूहाने जोरदार भरारी घेतली. उद्योग समूहातील कामगार बंधू-भगिनी आणि मालपाणी परिवार यांचे नाते हे वर्षानुवर्षे एका कुटुंबासारखे आहे. भगवद्गीतेत सांगितलेल्या कर्मयोगाच्या सिद्धांतावर मालपाणी उद्योग समूहाची उभारणी झाली असून त्याच तत्त्वावर वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. कारभारी उगले यांच्या मानपत्राचे वाचन व्यवस्थापक रमेश घोलप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. ज्ञानदेव सहाणे यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना मिश्रा यांनी तर कॉ. सुभाष कडलग यांनी आभार मानले.

Visits: 12 Today: 1 Total: 115172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *