वर्षानुवर्षे ‘विना अपघात’ सेवा हे ‘मालपाणी’तील कामगारांचे वैशिष्ट्य ः मालपाणी औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त मालपाणी उद्योग समूहात विविध उपक्रम संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘वर्षानुवर्षे विनाअपघात सेवा कुशलतेने देणे हे मालपाणी उद्योग समूहातील कामगारांचे वैशिष्ट्य आहे. सुरक्षेच्या साधनांचा वापर जागरूकतेने केल्याने कामामध्ये अचूकता येते आणि जीवघेणे अपघात टाळता येतात हे या कामगारांनी आपल्यातील सजगतेने सिद्ध केले आहे. त्यांच्या जागरूकतेचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक हर्षवर्धन मालपाणी यांनी केले.

4 ते 11 मार्च दरम्यान विविध उपक्रमांनी साजर्या झालेल्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा सांगता समारोह मालपाणी हेल्थ क्लबच्या सभागृहात येथे बुधवारी (ता.10) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री मालपाणी यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर औद्योगिक सुरक्षा तज्ज्ञ श्रीकांत कुलंगे यांच्यासह मालपाणी उद्योग समूहातील रमेश घोलप, शिवाजी आहेर, देवदत सोमवंशी उपस्थित होते.

‘मालपाणी उद्योग समूह म्हणजे एक परिवार आहे. इथे व्यवस्थापन आणि कामगार सहकारी परस्परांची पुरेपूर काळजी घेतात. समूहात स्थापन करण्यात आलेली सुरक्षा समिती वेळोवेळी सुरक्षाविषयक प्रशिक्षणासाठी प्रात्याक्षिके आणि कार्यशाळा आयोजित करीत असल्याने त्याचे प्रतिबिंब कामगारांच्या सफाईदार व सुरक्षित कार्यपद्धतीत दिसून येते. ‘जान है तो जहान है’ हे तत्व सर्वांना पटल्याने हे शक्य झाले आहे. मालपाणी उद्योग समूह आपल्या कामगार सहकार्यांवर पुत्रवत प्रेम करतो. त्यामुळे सर्व प्रकारचे सुरक्षा साधने मुबलक प्रमाणात पुरविली जातात. मागील दहा वर्षांपासून सुरक्षा सप्ताह अनेक उपक्रमांनी साजरा होतो. त्यातून कामगार अधिक जागरूक झाले आहेत, असे मालपाणी म्हणाले.

औद्योगिक सुरक्षा तज्ज्ञ श्रीकांत कुलंगे यांनी सुरक्षा विषयक अभ्यासपूर्ण व प्रभावी व्याख्यानातून कामगारांना अनेक महत्वाच्या गोष्टी तळमळीने समजावून सांगितल्या. 10 मार्च ही मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यू स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांची पुण्यतिथी असल्याने दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना तसेच कोविड संकटकाळात लक्षवेधी कामगिरी करणार्या सुरक्षा विभागातील, हाऊस कीपिंग विभागातील कर्मचार्यांना व गुणवंत कामगारांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोमवंशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सप्ताहातील विविध उपक्रमांची विस्ताराने माहिती दिली. यावेळी श्री. घोलप, श्री. आहेर यांची समयोचित भाषणे झाली. दोघांनीही आपल्या भाषणात सुरक्षा सप्ताहाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या देवदत्त सोमवंशी, रवींद्र कानडे, सुरक्षा विभाग प्रमुख दादासाहेब सुपेकर, संतोष राऊत, मंगेश उनवणे, राहुल शेरमाळे, अर्चना शुक्ला या सुरक्षा समितीच्या सदस्यांचे कौतुक केले. मालपाणी उद्योग समूहात सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे हे बारावे वर्ष आहे. म्हणजे बरोबर एक तप हा उपक्रम व्यवस्थितपणे अव्याहत सुरु ठेवण्याचे काम समितीने केले आहे, असे घोलप व आहेर म्हणाले. सूत्रसंचालन संतोष राऊत, मनोज हासे यांनी तर आभार प्रदर्शन कामगार नेते अर्जुन अरगडे यांनी केले. मालपाणी उद्योग समूहातील कामगार, सहकारी, पुरुष आणि महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
