मालपाणी परिवाराच्या सामाजिक कार्यातून श्रीरामाच्या कार्याचे दर्शन : डॉ. विश्वास उद्योगपती राजेश मालपाणींचा नागरी सत्कार; संगमनेरकरांनी अनुभवले ‘अपने अपने राम’
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या मालपाणी परिवाने गेली कित्येक वर्ष यशस्वी उद्योगासह लोकहिताचे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासली आहे. आपल्या औद्योगिक विस्ताराच्या माध्यमातून हजारो परिवारांना रोजगार मिळवून दिला आहे. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या व्यापक विस्तारातून पदोपदी प्रभू श्रीरामाच्या कार्याचे दर्शन घडते असे गौरवोद्गार विश्वविख्यात रामकथा मर्मज्ञ, युगवक्ता डॉ. कुमार विश्वास यांनी काढले.
उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मालपाणी परिवाराने त्यांच्या दोन दिवसीय रामकथेचे संगमनेरात आयोजन केले आहे. यावेळी प्रारंभी मालपाणी यांना शुभेच्छा देताना त्यांनी वरील उद्गार काढले. विधानसभेचे माजी सभापती, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, भारतीय जनता पक्षाचे नेते श्यामसुंदर जाजू, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह राजेश, डॉ. संजय, मनीष, गिरीश व आशिष मालपाणी आदी उपस्थित होते.
डॉ. विश्वास यांनी आपली ओघवती वाणी आणि रसाळ शैलीने उपस्थित श्रोत्यांना रामरसाने मंत्रमुग्ध केले. रामकथेचे वर्णन करतांना प्रसंगानुरुप सादर केलेल्या त्यांच्या कविता आणि गीतांनी प्रेक्षागारालाही रामनामात डोलायला लावले. प्रभु रामचंद्रांच्या जीवन चरित्राला मानवी जीवनाशी जोडताना त्यांनी दिलेले विविध दाखले, कविता, संकीर्तन, मार्मिक टिप्पणी आणि विनोदांनी जवळपास दोनतास चाललेल्या या कथारसात रंगत भरली.
तत्पूर्वी डॉ. विश्वास यांच्यासह माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भारतीय जनता पक्षाचे नेते श्यामसुंदर जाजू यांच्या हस्ते उद्योगपती राजेश मालपाणी यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. राजेश मालपाणी यांच्या औद्योगिक जीवनाचे विविध पैलू उलगडणार्या डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘ओपन सिक्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील व श्यामसुंदर जाजू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मालपाणी परिवाराच्या प्रदीर्घ सामाजिक व औद्योगिक प्रवासातील आपापल्या आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी रुजविलेला सामाजिक कार्याचा वारसा राजेश मालपाणी यांच्यासह त्यांच्या चारही भावंडांनी अव्याहतपणे पुढे सुरु ठेवल्याचे वरील वक्त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले. राजेश मालपाणी यांच्या दूरदृष्टीतून संगमनेरसारख्या छोट्या शहरातील या उद्योगाने देशभरात विस्तार केल्याबद्दल मालपाणी परिवाराबाबत प्रशंसोद्गारही वक्त्यांनी व्यक्त केले. डॉ. संजय मालपाणी यांनी कार्यक्रमाचे निवेदन तर मनीष मालपाणी यांनी आभार मानले.