सोमनाथ कानकाटे शिवसेनेचे नूतन शहरप्रमुख! संगमनेरच्या ठाकरे गटाला भगदाड; आढावा बैठकीत झाली निवड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यक्तिगत महत्त्वकांक्षेने ग्रासलेल्या काहींनी स्थानिक शिवसेनेचा ताबा घेतल्याने सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून अनेक दशके शिवसेनेशी बांधल्या गेलेल्या अनेकांची घुसमट वाढली होती. त्यातून उद्धव ठाकरे गटात फूट पडणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र ही घुसमट उफाळून बाहेर पडण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला असून गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला संगमनेरात मोठे भगदाड पडले. त्याचा पहिला परिणाम समोर आला असून प्रदीर्घकाळ सामान्य शिवसैनिक म्हणून जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करणार्‍या सोमनाथ कानकाटे यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) शहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कानकाटे यांच्या माध्यमातून स्थानिक सेनेच्या अभेद्य तटबंदीला तडे गेले असून येणार्‍या कालावधीत संपूर्ण तटबंदीच कोसळणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.


वर्षभरापूर्वी राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडी नंतर त्याचे पडसाद संगमनेरातही उमटण्याची स्थिती निर्माण झाली होती. या कालावधीत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बांधलेल्या स्थानिक निष्ठावान शिवसैनिकांनी वेळोवेळी आपली घुसमट पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातली. मात्र वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यातून काहीच साध्य न झाल्याने अखेर कधीकाळी संगमनेरात शिवसेनेची पाळेमुळे रुजवणार्‍या जुन्या शिवसैनिकांनी शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थानिक पातळीवर अशा अनेक शिवसैनिकांचा समावेश असलेल्या बैठकाही पार पडल्या. त्यातून स्थानिक शिवसेनेत फूट पडणार असल्याचे दिसू लागल्यानंतर दैनिक नायकने पंधरवड्यापूर्वी ठळक वृत्तही प्रसिद्ध केले आहे, गुरुवारी एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.


गुरुवारी (ता.24) व्यापारी हॉलमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुंबईहून आलेले पक्षनिरीक्षक प्रशांत काळे यांच्यासह शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, बाजीराव दराडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख कावेरी नवले, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम शेटकरी, रामभाऊ रहाणे व संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी सोमनाथ कानकाटे यांची संगमनेर शहरप्रमुखपदी निवड झाल्याचे पत्र खासदार लोखंडे व जिल्हाप्रमुख देवकर यांनी त्यांच्या हाती सुपूर्द केले. या कार्यक्रमात अनेकांनी शिंदेगटाच्या शिवसेना, युवासेना व महिला आघाडीत प्रवेश केला.


यावेळी बोलतांना खासदार लोखंडी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देतांना या योजना प्रत्येक वंचितापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवदूतांची असल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा उल्लेख करीत निम्मा जिल्हा विविध योजनाचा लाभार्थी असल्याचे सांगत त्यांनी आगामी सणांसाठी राज्य शासनाकडून देण्यात येणारा आनंदाचा शिधा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनाबद्ध काम करण्याचे आवाहन केले. पश्‍चिम घाटमाथ्यावरुन समुद्रात वाहून जाणारे पाणी लाभक्षेत्रात वळविल्याशिवाय समन्यायी पाणी वाटप कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अवघड असल्याचे सांगत त्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभारण्याची घोषणाही केली. म्हाळुंगी नदीच्या पुलासह अन्य विकासकामांसाठी मध्यरात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांनी सात कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


पक्षनिरीक्षक काळे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी असलेला वर्ग शिंदेगटात येत असल्याकडे लक्ष्य वेधतांना गेल्या वर्षभरातील ठळक घटनांचा आढावा घेतला. सामान्य माणसांचे सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र जनकल्याणाची कामे करीत असल्याचा उल्लेख करीत त्यांनी संघटनेला बळकटी देण्यासाठी नागरिकांशी जोडले जाण्याची गरज व्यक्त केली. नव्य संघटन शैलीत आता केवळ पक्षनिरीक्षक बाहेरुन येणार असल्याचे आणि बाकी सर्व पदाधिकारी स्थानिक जिल्ह्यातील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित प्रमुखांनी आपल्या कार्यकारी मंडळातील सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीने करण्याची सूचना कांबळे यांनी केली. या कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 74 Today: 1 Total: 394638

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *