शिक्षणातूनच आपला भविष्यकाळ घडतो ः चौधरी सारोळे पठार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नायक वृत्तसेवा, घारगाव
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. त्यातूनच आपला भविष्यकाळ घडत असतो. क्षेत्र कोणतेही निवडा मात्र त्यातून आपल्या कुटुंबासह गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झटले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या नगर विकास विभागाचे सचिव विजय चौधरी यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे नुकत्याच दहावी आणि बारावीमध्ये विशेष सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गोपाल कृष्ण ट्रस्ट, बाळेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार आणि श्री बाळेश्वर आश्रमशाळा सारोळे पठार या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या समारंभास डॉ. प्रतीक वाणी, डॉ. श्रद्धा वाणी, डॉ. दिग्विजय शिंदे, डॉ. संतोष पोखरकर, गोविंद शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे आदी उपस्थित होते. दरम्यान, महाआरती होऊन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला.

पठार भागातील श्री क्षेत्र बाळेश्वरच्या कुशीमध्ये वसलेल्या सारोळे पठार गावात शिक्षणाचा स्तर कायम उच्चशिखरावर राहिला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. गावातील डॉ. मोमीन सय्यद, डॉ. नरेंद्र क्षीरसागर, पंकज पोखरकर, सुनील घुले यांच्या संकल्पनेतून हा समारंभ होत असतो. या समारंभास सरपंच अहिल्या घुले, बादशहा फटांगरे, बी. व्ही. फटांगरे, डॉ. किशोर पोखरकर, दत्तात्रय फटांगरे, प्रशांत घुले, अमित फटांगरे, विनय फटांगरे, रामनाथ फटांगरे, तुकाराम फटांगरे, हौशीराम फटांगरे, नथू क्षीरसागर, कैलास पोखरकर, डॉ. पूनम क्षीरसागर, शबनम मोमीन यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बारावीमध्ये प्रथम आलेल्या हर्षदा घुले, साहिल मोमीन, तेजस्विनी फटांगरे, चैतन्य लंके, सुप्रिया लंके आणि दहावीमध्ये वैभव वर्पे, तेजल वर्पे, आकाश दशवंत, पूजा घुले, साक्षी घुले, कोमल बर्डे, भाग्यश्री काळे आदिंचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. विविध संस्थांचे पदाधिकारी, बाळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, बाळेश्वर आश्रमशाळेचे प्राचार्य, शिक्षक, बाळेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. पी. फटांगरे, शिक्षक यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 167 Today: 1 Total: 1876008

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *