जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरेंना जीवे मारण्याची धमकी राजूर पोलिसांत गुन्हा दाखल; सर्वच स्तरांतून धमकीचा तीव्र निषेध
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता भांगरे यांना रामेश्वर गजानन शातलवार या व्यक्तीने स्वत:च्या मोबाईलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे राजूर पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुनीता भांगरे यांना शुक्रवारी (ता.13) दुपारी 11 वाजून 49 मिनिटांनी रामेश्वर गजानन शातलवार यांनी स्वत:च्या मोबाईलवरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीमध्ये मुतखेल येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाचा भाऊ बोलत असून माझ्या भावाला आपण त्रास देऊ नये व त्याच्यावर कारवाई करु नये. अन्यथा आपणाला रस्त्यात कोठेही अडवून जीवे मारण्यात येईल. तुम्हांला माझे काय करायचे ते करा, अशी धमकी देण्यात आली. या संदर्भात राजूर पोलिसांत सुनीता भांगरे यांनी रामेश्वर शातलवार या व्यक्तीवर अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
सुनीता भांगरे ह्या राजूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या असून त्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या देखील त्या सदस्या आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुतखेल येथील आश्रमशाळेस भेट दिली असता त्याठिकाणी कीटकयुक्त पाणी व इतर सुविधांचा अभाव आढळून आला. त्यांनी त्या संदर्भात प्रकल्प कार्यालयात कारवाईचा बडगा उगारला होता. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत चालविल्या जाणार्या आश्रमशाळांमधील समस्या व अंदाधुंदी कारभाराबाबत मागील काही दिवसांमध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रकल्पस्तरीय समितीच्या सदस्या सुनीता भांगरे यांनी भांडेफोड करून समोर त्या बाबी समोर आणल्या होत्या. कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना जर त्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसतील, शिक्षणाची गुणवत्ता मिळत नसेल तर व्यर्थ जाणार्या खर्चाला अर्थ तरी काय? या भूमिकेतून सुनीता भांगरे ह्या वारंवार आश्रमशाळांना भेटी देत असतात. दरम्यान, अकोले पोलिसांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी नीता आवारी, स्वाती शेणकर, भाग्यश्री आवारी, अंजली कनाके, मंदा ताई, साळवे ताई, उज्वला राऊत, रेश्मा कानवडे, जयश्री देशमुख, सुरेखा सातपुते, अलका चौधरी, संदीप शेणकर, भागवत शेटे, विजय आवारी, दत्तात्रय आवारी, अभिजीत वाकचौरे, दीपक जगताप, भास्कर दराडे, अनिकेत तिटमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आदिवासी वाड्यावस्त्यांवरील महिला एकवटल्या असून, विविध स्तरांतून जाहीर निषेधही व्यक्त होत आहे.