‘अखेर’ कुरकुटवाडीच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश! वाघाने नव्हेतर घायाळ आशिकने केला हल्ला; पोलीस उपअधीक्षकांसह घारगावच्या उपनिरीक्षकांची कामगिरी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाघाने हल्ला करून ठार केल्याचा संशय असलेल्या, मात्र वेगवेगळ्या कारणांनी निष्कर्ष बाहेर येण्यासही विलंब झाल्याने ‘गुढ’ बनलेल्या कुरकुटवाडीतील तरुणाच्या खुनाचे रहस्य उलघडण्यात अखेर पोलिसांना तब्बल एकोणावीस दिवसांनी यश आले आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगावचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी केलेल्या कसून तपासात या रहस्यमयी खुनाचा गुंता सोडवण्यात आला असून मयताने आरोपीच्या मैत्रिणीला सोशल माध्यमातील एका प्लेटफॉर्मवर मैत्रीची रिक्वेस्ट पाठवली होती. त्या रागातूनच सदरचा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्याच गावातील गणेश बबन कुरकुटे याला पोलिसांनी अटक केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सचिन कुरकुटे ठार झाल्याची बोंब देखील आरोपीनेच गावात उठवली होती, असेही आता तपासातून समोर आले आहे.
याबाबत पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सदरचा प्रकार पठारभागातील कुरकुटवाडी या गावात घडला होता. या गावातील सचिन भानुदास कुरकुटे हा बावीस वर्षीय तरुण आपल्या घराच्या पडवीत झोपलेला असताना त्याच्या गळ्याला खोलवर जखम झालेल्या अवस्थेत त्याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला वाघाने हल्ला केल्याने तो जखमी झाल्याचे बोलले गेले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला. आळे (जि.पुणे) ग्रामीण रुग्णालयात मयताची उत्तरीय तपासणी झाली. परंतु, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास विलंब लागला.  उशिराने का होईना, मात्र प्राप्त झालेल्या उत्तरीय तपासणी अहवालातून सदर तरुणाच्या गळ्यावर झालेली जखम वाघाच्या दातांची अथवा नखांची नव्हेतर तीक्ष्ण हत्याराची असल्याचे  समोर आले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत या प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांना सोबत घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली.
मयत तरुणाच्या सामाजिक संबंधांसह आर्थिक व नाजूक संबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला. यासर्व गोष्टी तपासल्या जात असताना एका छोट्याशा गोष्टीतून या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मध्यंतरीच्या काळात मयत सचिन भानुदास कुरकुटे याने आळेफाटा येथील एका तरुणीला मैत्री करण्यासाठीची विनंती (फ्रेंड्स रिक्वेस्ट) पाठवली होती. सदरची तरुणी त्याच गावातील गणेश बबन कुरकुटे (वय 21) या तरुणाची मैत्रीण असल्याने सचिनच्या कृत्याचा त्याला राग आला. त्यातून त्यांच्यात वादावादीही झाली होती.
त्याचेच पर्यवसान गणेश बबन कुरकुटे या अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाने 27 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सचिन भानुदास कुरकुटे हा आपल्या घराच्या पडवीत झोपलेला असताना कोयत्याने त्याच्या गळ्यावर एकच वार करून त्याचा खून केला. तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी अतिशय बारकाईने या प्रकरणाचा तपास केला असून त्याच्या निष्कर्षातून गणेश कुरकुटे याचे नाव ठळकपणे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. तब्बल एकोणावीस दिवसानंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याने पाच महिन्यांपूर्वी बोटा शिवारातील खून प्रकरणही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्या प्रकरणातही पोलिसांना अद्यापही आरोपींचा माग काढता आलेला नाही. कुरकुटवाडी खुनाच्या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, घारगावचे निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, सहाय्यक फौजदार एच.डी.टकले, पोलीस कॉन्स्टेबल पी.एस.चव्हाण, प्रमोद गाडेकर, चालक एन.एम बिरे, पोलीस नाईक एस.एस .धनाड व श्रीरामपूर सायबर सेलचे ए.ए.बहिरट यांनी केला. 
Visits: 6 Today: 1 Total: 23099

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *