कोपरगाव पालिकेने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून दिलासा द्यावा ः खैरे

कोपरगाव पालिकेने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून दिलासा द्यावा ः खैरे
माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 अखेर माफ करण्याची आग्रही मागणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिकेने शहरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनातून केली आहे.


यापूर्वी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन माहे एप्रिल, मे आणि जून 2020 महिन्याची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी केली होती. सुमारे चार महिन्यांपूर्वी मागणी करूनही नगरपालिकेकडून अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. दिवसेंदिवस कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातही रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आजही शहरातील बाजारपेठ, दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाही. रोजगार, उद्योगधंदे ठप्प झाल्याने व्यापारी, गोरगरीब, छोटे व्यावसायिक, मध्यमवर्गीय तसेच हातावर पोट भरणार्‍या नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे. या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करताना जीवन मरणाच्या अवस्थेतून नागरिक जात आहे. याही परिस्थितीत कोपरगाव पालिकेच्या करनिर्धारण विभागाकडून नागरिकांना करपावत्या वाटपाचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळेे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोरोनामुळे सर्वांवरच आर्थिक संकट कोसळले आहे. रोजचा उदरनिर्वाह करणेही मुश्किल झाले आहे. तसेच जुलै, ऑगस्ट महिन्यातही कोरोनाच्या परिस्थितीमुळे व्यवसायांवर परिणाम झाल्याने आर्थिक आवक मंदावली आहे. त्यामुळे माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 अखेर पालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप शहराध्यक्ष खैरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *