‘बाण सुळका’ पिंपरी-चिंचवडच्या मावळ्यांनी केला सर! तब्बल तीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर गिर्यारोहकांची मोहीम फत्ते

नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यातील निसर्ग सौंदर्य कायमच पर्यटकांना भूरळ घालत आहे. त्यातच सह्याद्रीच्या कुशीत असलेले गड-किल्लेही गिर्यारोहकांना आकर्षित करत आलेल आहे. यातील चढाईसाठी अतिशय अवघड मानला जाणारा ‘बाण सुळका’ पिंपरी-चिंचवडच्या मावळ्यांनी नुकताच सर करत विक्रम केला आहे. तब्बल तीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर 710 फूट उंचीचा सुळका सर करण्यात गिर्यारोहकांना यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशन, स्पोर्ट क्लाईम्बिंग असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आणि राजे शिवाजी क्लाईम्बिंग वॉल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून दहा जणांनी हा सुळका सर केला. अकोले तालुक्यातील साम्रद गावातील सांधण दरीजवळ असलेला 710 फूट उंचीचा बाण सुळका गिर्यारोहकांना नेहमीच साद घालत असतो. नावाप्रमाणे बाणासारखा हा कातळ आकाशाकडे झेपावला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, मधमाशांची मोठी पोळी, दुर्गम प्रदेश आणि खडतर चढाई अशा आव्हानांचा सामना गिर्यारोहकांना करावा लागतो.

या मावळ्यांनी एक जानेवारीपासून मोहिमेची तयारी सुरू केली होती. प्रत्यक्ष 25 जानेवारीला चढाईला सुरुवात झाली. त्यानंतर तीस तासांनी 26 जानेवारीला मोहीम फत्ते झाली. नीलराज माने, मोहन हुले, तुषार खताळ, गितेश बांगरे, रोहित मडके, नीलेश मोरे, जयवंत कोकणी, संतोष मांडे, तानाजी केकरे, मयूर केकरे हे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते. माने आणि हुले यांनी सुळका सर केल्यानंतर तिरंगा फडकवित राष्ट्रगीताद्वारे मानवंदना दिली.

गेल्या वर्षी सेफ क्लाईम्बिंग इनिशिएटिव्ह (स्की) संस्थेने बाण सुळक्यावर नव्या मार्गाने चढाई करीत बोल्ट बसविले होते. याच मार्गाने चढाई करीत मावळ्यांनी बोल्टची चाचणी घेतली. गेल्या वर्षी स्कीच्या सदस्यांनी आखलेल्या मार्गामुळे चढाई सुकर झाल्याची भावना गिर्यारोहकांनी व्यक्त केली. पीसीएमए संस्थेचे संस्थापक सुरेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आखण्यात आली. गिर्यारोहक सुनील पिसाळ, विवेक मराठे, स्वानंद जोशी, नरेंद्र पाटील, श्रीकृष्ण कडूसकर, नुवाजिश पटेल यांनी मार्गदर्शन केले.

बाण सुळका 1998 साली झाला. यावर्षी बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली. दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक यांच्या संघाने ही मोहीम फत्ते केली होती. त्यानंतर विवेक मराठे यांच्या पथकाने 1991 मध्ये हा सुळका सर केला होता. त्यानंतर स्की संस्थेच्या सदस्यांनी नव्या वाटेने चढाई करीत बोल्ट लावण्याचे आव्हानात्मक काम जानेवारी 2020 मध्ये केले आहे.
