स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सूर्यनमस्कारांचा नवा विश्व किर्तिमान! गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसह ऑलिंपिया रेकॉर्डस्मध्ये झाली नोंद : डॉ. संजय मालपाणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाने नवा विश्व किर्तिमान प्रस्थापित केला आहे. जवळपास दिड महिना चाललेल्या या उपक्रमात भारतासह जगभरातील 176 देशांमधून 57 लाख योगसाधकांसह सुमारे सव्वा लाख संस्थांनी सहभाग घेत 114 कोटी सूर्यनमस्कार घातले. जगभरात इतक्या विस्तृत प्रमाणात आयोजित झालेल्या अशा दुर्मिळ उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह ऑलिंपिया बुक ऑफ रेकॉर्डस् व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाल्याची माहिती या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे प्रकल्प संयोजक डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

पतंजली योगपीठ, गीता परिवार, राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन, क्रीडा भारती व हार्टफूलनेस इन्स्टिट्युट या संस्थांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले होते. 1 जानेवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत जगभरात राबविल्या गेलेल्या या उप्रकमात 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र ठरलेल्या कालावधीपूर्वीच हा आकडा पूर्ण झाला आणि 20 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 114 कोटी सूर्यनमस्कारांची नोंद झाली. या जागतिक पातळीवरील उपक्रमात 176 देशातील 57 लाखांहून अधिक योगसाधकांसह 1 लाख 24 हजार 485 सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या.

या कालावधीत आयोजकांना जगभरातून 4 लाख 39 हजार 551 योगासनांची वेगवेगळी छायाचित्रे प्राप्त झाली, त्यालाही गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारा जगातील सर्वात मोठा ऑनलाईन योग फोटो अल्बम म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या योग शिबिरात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) व ऑलिंपिया रेकॉर्डस् (कॅनडा) या संस्थांनी सूर्यनमस्कारांच्या विश्वविक्रमाचे प्रशस्तिपत्रक योगर्षी स्वामी रामदेव महाराज, गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, उपक्रमाचे प्रकल्प अध्यक्ष डॉ. जयदीप आर्य, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा या उपक्रमाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प संयोजक डॉ. संजय मालपाणी आदिंच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वरील संस्थांनी योगासनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी जागतिक पातळीवर मर्यादीत कालावधीत 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला इतका उदंड प्रतिसाद मिळाला की सुरुवातीच्या 25 दिवसांतच आयोजकांच्या 75 कोटी सूर्यनमस्कारांचा संकल्प पूर्ण झाला. मात्र त्यानंतरही 20 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम सुरुच ठेवला गेल्याने ठरलेल्या कालावधीत संकल्पापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे तब्बल 114 कोटी सूर्यनमस्कार घातले गेले. केंद्र सरकारच्या खेल मंत्रालय तथा फिट इंडिया, खेलो इंडिया, आयुष मंत्रालय, शिक्षा मंत्रालय, सांस्कृतीक मंत्रालय व आयसीसीआर या केंद्र सरकारच्या संस्थांसह हरियाणा योग आयोग, एलेन करिअर इन्स्टिट्युट, नवयोग, भारत स्काउट गाईड, डी.ए.व्ही. संस्थान, एस व्यासा व अमृता योग या संस्थांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले.

Visits: 26 Today: 1 Total: 115887

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *