थोरात कारखान्यात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी? जुन्यांना नारळ; कर्तुत्व शून्य पुढार्यांना घरचा रस्ता..
संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
राज्यात सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यावेळी सत्ताधारी थोरात गटाकडून जुन्यांना ‘नारळ’तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता असून कर्तुत्व शून्य पुढाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी ११ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १२ मे रोजी मतमोजणीनंतर लगेचच निकाल घोषित केला जाणार आहे. गुरुवार दि. ३ एप्रिल ते बुधवार दि. ९ एप्रिल या सात दिवसाच्या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे दरम्यान उमेदवारी अर्ज मिळतील आणि ते स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारी अर्जांची यादी मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
त्यानंतर मंगळवार दि.१५ एप्रिल ते मंगळवार दि. २९ एप्रिल या कालावधीत निवडणूक लढवू न इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हाचे वाटप शुक्रवार दि.२ मे रोजी करण्यात येणार आहे. रविवार दि.११ मे रोजी मतदान तर सोमवार दि.१२ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांची धावपळ आणि पळापळ वाढली असून आपण कसे उमेदवारीसाठी योग्य आहोत हे नेतृत्वाला पटवून देण्यासाठी चढाओढ लागण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे सर्वेसर्वा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अनपेक्षित पराभव झाला. आणि कुठलीही निवडणूक न लढवलेल्या नवख्या अमोल खताळ यांनी बाजी मारली. थोरात यांचा पराभव आणि खताळ यांचा विजय भल्याभल्यांना चक्रावुन टाकणारा ठरला. या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ आपण चांगल्या पद्धतीने बांधला असल्याचा दावा माजी मंत्री बाळासाहेब थोरात वारंवार करत होते. मात्र त्यांनी बांधलेल्या या मतदारसंघाला कशी ‘वाळवी’ लागली याचे आत्मपरीक्षण थोरात यांनी गेल्या तीन चार महिन्यात केले असेल.
स्थानिक गाव पातळीवरील जनाधार गमावलेल्या कर्तुत्व शून्य पुढाऱ्यांवर ठेवलेला अति आत्मविश्वास,वडील झाला की मुलगा, चुलता झाला की पुतण्या, आजा झाला की नातू, अशा त्याच त्याच लोकांना विविध संस्थात प्रतिनिधित्व यासारख्या अनेक गोष्टी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभेतील पराभवाला कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे कारखाना निवडणुकीत बाळासाहेब थोरात यावर प्रकर्षाने लक्ष देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांमध्ये काही गावांनाच वारंवार, वेळोवेळी प्रतिनिधित्व दिल्याने इतर गावांतील थोरात समर्थक पुढारी असमाधानी आहेत. दोन दोन, तीन तीन पदे एकाच गावाला मिळत असतील तर आम्ही काय सतरंज्याच उचलायचा का? असा सवाल ते खाजगीत बोलतांना व्यक्त करत आहेत. आत्ता नाही तर कधीच नाही असा टोकाचा पवित्रा घेण्याच्या मनस्थितीत इतर गावातील थोरात समर्थक पुढारी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अशा लोकांचा विचार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्राधान्याने करावा लागणार आहे.
पदे केवळ मिरवायला नसतात तर नेतृत्वाला स्थानिक पातळीवरुन मतांच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी असतात. यासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पुढार्यांनी आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जनाधार वाढवण्यासाठी काम करण्याची आवश्यकता असते. मात्र याचा विसरच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पुढार्यांना पडला होता. ते विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री थोरात यांना पडलेल्या मतांच्या आकडेवारी वरून दिसून येते. ज्या गावात तालुका पातळीवरील विविध पदे आहेत, तेथेच थोरात यांची विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले.
याचे आत्मपरीक्षणही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कारखाना निवडणुकीची उमेदवारी देताना करावे लागणार आहे. उमेदवारी मागायला आलेल्या इच्छुकांच्या पाठी किती जनाधार आहे, याची चाचपणी करावी लागणार आहे. त्याचे गावातील वागणे तपासण्याची गरज आहे. केवळ डेपोटेशन घेऊन, गर्दी केली म्हणून उमेदवारी बहाल करणे योग्य होणार नाही. कारण डेपोटेशन मध्ये असे अनेक कार्यकर्ते असतात, की त्यांना नाईलाजाने जावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार माजी मंत्री बाळासाहेब थोरात करतील अशी आशा सभासद वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान विधानसभेच्या माध्यमातून आत्मविश्वास दुणावलेल्या आ.अमोल खताळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साथीने सत्ताधाऱी थोरात गटाला आव्हान देण्याची तयारी सुरू केली असली तरी आमदार खताळ अर्थात महायुतीला कारखाना जिंकणे पाहिजे तेवढे सोपे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या ‘हंगामा’च्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या ताकतीच्या ‘गाळपा’वर विजयाची ‘साखर’महायुतीच्या ‘पोत्यात’ पडते की नाही, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.