खाद्यतेलाच्या चोरांना गजाआड करीत संगमनेर शहर पोलिसांची ‘दमदार’ कारवाई! पुरावा नसतानाही तांत्रिक तपासाच्या आधारावर तब्बल तीस लाखांच्या तेलाचा अपहार केला उघड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील वाहनातून आणलेल्या 30 लाखांहून अधिक किंमतीच्या खाद्यतेलाच्या अपहार प्रकरणाचा तपास अतिशय कौशल्यपूर्वक करीत संगमनेर पोलिसांनी अतिशय दमदार कारवाई केली आहे. या प्रकरणातील दोघा सूत्रधारांना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या तेलासह दीड लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणात अजूनही 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत होणं बाकी असून पोलीस तपासात आणखी काही नावे समोर आली आहेत. लवकरच त्यांनाही गजाआड करुन संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला जाईल अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. संगमनेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत जलदगतीने केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे कौतुकही केले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर येथील सूरत येथील एकेटी लॉजिस्टीक या कंपनीने मोडासा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून संगमनेरातील अफजलखान साहेबखान पठाण (रा.मोमीनपुरा, संगमनेर) यांच्या मालकीच्या मालट्रकमधून (क्र.एम.एच.17/ए.जी.7789) चालक अरुण उदमले (रा.पोखरी हवेली, ता.संगमनेर) याने अदानी कंपनीतून फॉर्च्युन सनफ्लॉवर तेलाचे प्रत्येकी 15 लिटरचे 1 हजार 90 डबे व एक लिटर पॅकींग असलेले व एका डब्यात दहा लिटर तेल असलेले दोनशे डबे असा माल भरला होता. हा संपूर्ण माल संबंधित वाहनचालकाने पुण्यातील बसंत ट्रेडींग कंपनी येथे पोहोचवणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र सदरचे वाहन पुण्यात न जाता राजगुरुनगर (खेड) येथे पोहोचले असता त्यातील तेलाचा सगळा माल एम.एच.12/एफ.झेड.8797 या दुसर्‍या वाहनात उतरविला गेला. गाडी खाली होवूनही भाड्याचे पैसे न मिळाल्याने संबंधित वाहनाच्या चालकाने सुरुवातीला खेड व नंतर पुणे पोलिसांकडे धाव घेतली, मात्र त्यांनी त्याला संगमनेरला पाठविल्याने नाट्यमय ‘घडामोडीं’नंतर याप्रकरणाचा गुन्हा संगमनेरात दाखल झाला.

याप्रकरणात एकेटी लॉजिस्टीक कंपनीचे अशोककुमार चौधरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला वाहनाचा चालक अरुण उदमले व मालक अफजलखान पठाण यांना या प्रकरणी आरोपी करुन तपास सुरु केला. या संपूर्ण घटनेत कोणतेही ठोस पुरावे नव्हते व वाहन चालकाकडूनही तपासाला सहाय्य होईल इतकी माहिती मिळत नसल्याने अखेर पोलिसांना तांत्रिक तपासाचा आधार घ्यावा लागला. त्यातून राजगुरुनगर येथे क्रॉसिंग झालेला माल बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नेण्यात आला व तेथे तो पुन्हा दोन वेगवेगह्या आयशर वाहनांमध्ये विभागण्यात आल्याची तोकडी माहिती पोलिसांना मिळाली. तेथे जावून पोलिसांनी अधिक तपास करता त्यातील एक वाहन श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे खाली झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी काष्टीत छापा घातला असता हा प्रकार अहमदनगरमधील नरेंदर राजेंद्रसिंग रोतेला (वय 41, रा.पाईपलाईन रोड) व अनिल भारत मीरपगार (वय 30, रा.तारकपूर) या दोघांनी केल्याचे समोर आले.

त्या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी अहमदनगरमध्येही छापे घातले, मात्र पोलीस येण्यापूर्वीच ते पसार झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक माहिती मिळविली असता ते दोघेही गोवा येथे असल्याचे पोलिसांना समजले. शहर पोलिसांनी गोव्यात जावून त्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे अपहार केलेल्या मालाची चौकशी करता आष्टीत दोन भागात विभागलेला मालापैकी एक वाहन रोतेला याच्याकडे तर दुसरे वाहन औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील किशोर पदुने याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा नगरमध्ये छापा घालीत 8 लाख 33 हजार 580 रुपयांचे प्रत्येकी 15 लिटर खाद्यतेल असलेले 330 डबे व दीड लाख रुपयांची रोकड असा एकूण 9 लाख 83 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केला. या प्रकरणात अहमदनरमधील दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात आले असून उर्वरीत मालाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

या प्रकरणाचा प्रवास राजगुरुनगर (खेड), पुणे व संगमनेर असा झाला. गुजरातहून खेडपर्यंत सदरचा माल संगमनेरच्या वाहनात आला होता. मात्र खेडमध्ये तो दुसर्‍या वाहनात उतरविला गेला, मात्र भाड्याचे पैसेच न दिले गेल्याने संगमनेरच्या वाहनचालकाने पोलिसांकडे धाव घेतली. त्या दरम्यान सदरच्या मालाचा अपहार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर थेट वाहतूक कंपनीने नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडेच तक्रार केल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने संगमनेरात या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आणि अवघ्या 15 दिवसांतच त्याचा छडाही लागला. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात पोलीस अंधारात चालत होते, मात्र तरीही त्यांनी अत्यंत सचोटीने आणि कौशल्यपूर्वक तांत्रिक बाबींचा आधार घेत तपास पूर्ण केला आणि त्यातील दोघा सूत्रधारांना अटकही केली आहे. संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा जलद तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

Visits: 72 Today: 1 Total: 1112715

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *