उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या अंगावर टाकला ऑइलसदृश्य पदार्थ अधिकार्‍यांचे कामबंद आंदोलन तर चालक मालक प्रतिनिधी संघाच्यावतीने निषेध

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली नाही असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालायला टाळे ठोकून अधिकारी नानासाहेब बच्छाव यांच्या अंगावर ऑइलसदृश्य पदार्थ टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सोमवारी (ता. 18) दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालायला समोर ठिय्या मांडला. त्यानंतर कार्यालयाचे मुख्य गेट बंद केले व घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने बच्छाव यांना फोन करून याठिकाणी बोलावून घेतले. ते आल्यानंतर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी का साजरी केली नाही याचा जाब विचारला. तसेच त्यांना पुष्पहार घातला. त्यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर ऑइल सदृश पदार्थ टाकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बच्छाव गोंधळून गेले. त्यांनी येथून काढता पाय घेत निघून गेले. यानंतर परिवहन अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारात सर्व शहर पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. प्रथम अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची भेट घेतली. बच्छाव हे शहर पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या समवेत मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट, सुनील गोसावी, जयश्री बागुल, विकास सूर्यवंशी, पद्माकर पाटील, धर्मराज पाटील, उपनिरीक्षक श्वेता कुलकर्णी, अनिल गावडे, मयुरी पंचमुख, सुजाता बाळसराफ व कर्मचारी उपस्थित होते.

या घटनेचा चालक मालक प्रतिनिधी संघाच्यावतीने निषेध करण्यात आला. बच्छाव यांच्या आठ महिन्याच्या कालावधीत आत्तापर्यंत वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आज घडलेल्या घटनेमागे वर्गणी तसेच मार्चअखेरच्या नावाखाली सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील दंडाची कारवाईची किनार असल्याची यावेळी चर्चा होती.

Visits: 6 Today: 2 Total: 30568

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *