शहर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव! गेली अनेक वर्ष सडत पडलेली वाहने विकणार; इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलिसांनी बेवारस अथवा चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या मात्र त्यांच्या मालकांचा थांगपत्ता न लागलेल्या वाहनांचा लिलाव करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सदरची वाहने पोलीस वसाहतीच्या परिसरात सडत पडलेली आहेत. त्यांची लिलावाद्वारे विक्री करण्याबाबत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायाधीशांसह तालुका दंडाधिकार्यांनी परवानगी दिल्यानंतर आता येत्या सोमवारी (ता.18) सकाळी 11 वाजता या वाहनांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असून इच्छुकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर वसलेल्या संगमनेर शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात असल्याने शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यांच्या तपासातून अनेकवेळा पोलिसांना शहरातून चोरीला गेलेल्या वाहनांसह इतर वाहनेही हाती लागतात. चोरी गेलेल्या वाहनांचे नोंदणीकृत क्रमांक बदलले जात असल्याने अशा वाहनांच्या मालकांचा शोध लावण्यासाठी पोलीस चेसीवरील क्रमांकाचा वापर करतात, मात्र अलिकडच्या काळात चोरट्यांकडून चेसी नंबरही बदलले जावू लागल्याने जप्त केलेल्या अनेक वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेणे जिकरीचे होते.
त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून शहर पोलीस ठाण्याच्या आवारात अशा वाहनांची अक्षरशः दाटी झाली होती. मात्र गेल्या शिवजयंतीच्या दिनी शहर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष व तहसील कार्यालयाच्या सुशोभिकरणाच्या कामानिमित्ताने सदरची वाहने तेथून पोलीस वसाहतीत हलविण्यात आली होती. आता या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वसाहतीत राहणार्या पोलीस कर्मचार्यांना त्याचा अडसर होत आहे. त्या कारणाने सदरची वाहने विक्री करावी अशी मागणी कर्मचार्यांमधून होत होती. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसह तहसिलदार तथा तालुका दंडाधिकार्यांशी पत्रव्यवहार करुन सदरची बेवारस वाहने लिलावाद्वारे विक्री करण्याची परवानगी मागितली होती. या दोन्ही दंडाधिकार्यांनी त्यास मान्यता दिली असून गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेली व बाह्य वातावरणामुळे सडत चाललेली ही वाहने विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी पोलिसांनी येत्या 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात या वाहनांचा लिलाव जाहीर केला असून इच्छुक खरेदीदारांनी यावेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.