संगमनेरच्या ऐतिहासिक रथोत्सवास महिलांनी अवश्य यावे – भालेकर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती; सकाळी सात वाजता हलणार रथ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठी प्राचीन परंपरा व नऊ दशकांपूर्वीच्या घटनेने ऐतिहासिक ठरलेला संगमनेरचा हनुमान जयंती उत्सव शनिवारी साजरा होत आहे. त्या निमित्ताने सकाळी सात वाजता चंद्रशेखर चौकातून ऐतिहासिक रथ काढण्यात येणार असून हा रथ ओढण्याचा मान संगमनेरी महिलांना असल्याने सर्व समाजातील महिलांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे विश्वस्त कमलाकर भालेकर यांनी केले आहे. यंदाच्या रथोत्सवात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार सहभागी होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरच्या चंद्रशेखर चौकातील हनुमान मंदिरातून हनुमान जयंतीच्या दिवशी रथ काढण्याची परंपरा आहे. मात्र सन 1927 ते 1929 या तीन वर्षांच्या कालावधीत तत्कालीन ब्रिटीश शासनाने या उत्सवात विविध कारणांनी अडथळे आणले. 23 एप्रिल, 1929 रोजी तर भल्या पहाटेच इंग्रज पोलिसांनी चंद्रशेखर चौकाला पोलीस छावनीचे स्वरुप देत रथ काढण्यासच मनाई केली. त्यामुळे या प्राचीन परंपरेत खंड पडतो की काय अशी स्थिती एकवेळ निर्माण झाली होती. मात्र ब्रिटीशांचा दबाव झुगारुन झुंबराबाई अवसक (शिंपी) या झुंजार महिलेने पोलिसांची नजर चुकवून मारुतीरायाची चलप्रतिमा रथात आणून बसविली, आणि लीला पिंगळे, बंकाबाई परदेशी यांच्यासह उपस्थित असलेल्या शेकडों महिलांनी महाबली हनुमान की जय.. चा घोष करीत रथ ओढण्यास सुरुवात केली. तेव्हाच्या पोलीस दलात महिला पोलिसांची वाणवा असल्याने ब्रिटीश पोलिसांना बघत राहण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
तेव्हापासून दरवर्षीच्या या उत्सवात मारुतीरायाच्या जन्म सोहळ्यानंतर निघणार्या या प्राचीन रथाला ओढण्याचा पहिला मान महिलांना देण्यात येतो. मागील दोन वर्ष कोविड संक्रमणामुळे हा उत्सव साधेपणाने आणि केवळ औपचारीक स्वरुपात साजरा केला गेला. मात्र यंदा कोविड संक्रमण पूर्णतः नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांवरील सर्व निर्बंध हटविल्याने दोन वर्षांनंतर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सालाबादप्रमाणे सकाळी श्री हनुमानाच्या जन्मोत्सवानंतर सकाळी सातच्या सुमारास या ऐतिहासिक रथोत्सवाला सुरुवात होईल. संगमनेरचा हा ऐतिहासिक रथोत्सव संगमनेरी महिलांच्या पराक्रमाचे प्रतिक आहे. शनिवारी सकाळी सात वाजता निघणार्या या रथोत्सवाला संगमनेरकर महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.