तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही पडली बावीस रुग्णांची भर!
आजच्या अहवालात शहरातील एकाही रुग्णाचा समावेश नाही!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येत सलग वाढ होण्याचा सिलसिला कायम असून आजही तालुक्यातील रुग्ण संख्येत 22 रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण रॅपिड अँटीजेन चाचणीतून समोर आले असून यात शहरातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही. तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही 22 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या चौदाव्या शतकाच्या पायरीवर जाऊन 1 हजार 395 थांबली आहे.
प्रशासनाने आज जाहीर केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून तालुक्यातील कुरकुटवाडी, आश्वी खुर्द व शिबलापुर परिसरातील कोविडच्या संक्रमितांची संख्या वाढली आहे. आजच्या अहवालातून तालुक्यातील शिबलापुर येथील 65 वर्षीय इसमासह 40 वर्षीय तरुण व 62 वर्षीय महिला, आश्वी खुर्द परिसरातून 75 वर्षीय वयोवृद्ध, तीस वर्षीय तरुण, 50 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुणी व आठ वर्षीय बालकास संक्रमण झाले आहे. त्यासोबतच कुरकुटवाडीत सलग चार रुग्ण समोर आले असून तेथील 69, 62, 32 व 22 वर्षीय पुरुषांना कोविडची लागण झाली आहे.
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील तीस व 47 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 72 वर्षीय इसम, राजापूर येथील 25 वर्षीय तरुण, चिकणी येथील सात वर्षीय बालकासह 36 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 45 वर्षीय महिला, वडगाव पान येथील तीन वर्षीय बालकासह 32 वर्षीय तरुण व कोल्हेवाडी येथील 49 वर्षीय इसमास कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही ही बावीस रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या 1 हजार 395 वर जाऊन पोहोचली आहे.