राहात्यात विना मास्क असणार्या नागरिकांवर कारवाई
नायक वृत्तसेवा, राहाता
कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. तरी देखील नागरिक मुक्तपणे विना मास्क संचार करत आहे. शासन संक्रमण रोखण्यासाठी पुन्हा सतर्क झाले असून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित विभागांना सूचितही केले आहे. त्यानुसार राहाता प्रशासनही कोरोनाचा लढा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहे. कोविडच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच नियम पाळण्याबाबतचे आवाहनही केले जात आहे.
सदर कारवाई शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसर, पोलीस ठाणे परिसर, शिवाजी महाराज चौक, चितळी रस्ता आदी ठिकाणी करण्यात आली. यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या आणि विना मास्क फिरणार्या नागरिकांकडून पालिका व पोलिसांद्वारे दंड आकारण्यात आला. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, मास्क वापरावे, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावे. ज्यांना लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली आहे, त्यांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन तपासणी व उपचार करावेत. अन्यथा पुन्हा ‘लॉकडाऊन’ अटळ आहे.
– निखील वाबळे (सामाजिक कार्यकर्ते, राहाता)