पठारभागात कोसळधारा पडल्याने पिकांचे नुकसान शेतात पाणी साचल्याने पिके सडण्याची शेतकर्यांना भीती

नायक वृत्तसेवा, घारगाव
सुमारे 15 दिवस मुक्काम वाढविलेल्या पावसाने अखेर परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थानहून 6 ऑक्टोबरला हा परतीचा प्रवास सुरू होणार असला तरी पुढचा आठवडाभर उघडीप असल्याने यावर्षीचा पावसाळा संपल्यासारखा आहे. मात्र, शुक्रवारी (ता.1) संगमनेर तालुक्याच्या पठारभागात कोसळधारा पडल्याने लाल कांदा, सोयाबीन, कांद्याचे रोप, मका आदी पिकांना फटका बसला आहे. तर अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके सडण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.

साधारणतः 17 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातून पाऊस आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करतो. यंदा मात्र त्याचा मुक्काम चांगलाच लांबला आहे. बंगालच्या उपसागरात सातत्याने निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र, त्यानंतर ‘गुलाब’ चक्रीवादळाचा तडाखा यामुळे पावसाने परतीला पंधरा दिवस अधिक घेतले. मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानेही विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढविला. यामध्ये संगमनेर तालुक्याच्या पठारभागात शुक्रवारी धो ऽऽ धो ऽऽ पाऊस कोसळल्याने शेंद्री कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या नांदूर खंदरमाळ, बावपठार, मोरेवाडी आदी भागाला मोठा फटका बसला आहे. याचबरोबर सोयाबीन, कांद्याचे रोप, मका यांनाही फटका बसला असून, ठिकठिकाणी शेतात पाणी साचले आहे.

ऑगस्ट महिन्यात पाऊस दिसेनासा झाला होता. यामुळे पठारातील पाण्याचे उद्भव कोरडेठाक स्थितीत होते. त्यामुळे यंदा देखील पाऊस हूल देतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने तूट भरुन काढली आहे. एरव्ही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कायमच कसरत करावी लागते. शुक्रवारी साकूर मंडलात 35.8, घारगाव 35.5 तर डोळासणे मंडलात 35.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे मळभ काही प्रमाणात दूर होणार आहे. यातून एकीकडे दिलासा तर दुसरीकडे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
