काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून ‘नामांतरा’ला विरोध असल्याचा पुनरुच्चार! बाळासाहेब थोरातांनी ट्विट करुन ठणकावले; आता विषय बनला देशव्यापी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात सध्या नामांतराचा विषय गाजत असून त्यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ व्हावे अशी मागणी होत असताना काँग्रेसचा मात्र त्याला विरोध आहे. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत आहे. मात्र हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नसल्याची आठवण काँग्रेस करुन देत आहे. दुसरीकडे भाजप शिवसेना आणि काँग्रेस नाटक कंपनी असल्याची टीका करत आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. याबाबत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.’


तसेच त्यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी जाहीर व्यक्त केली. ते म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असंही ते म्हणाले आहेत.

नामांतराच्या गोष्टीतून सर्वसामान्यांचा विकास साध्य होत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे संगमनेरातूनच त्यांनी याला प्रखर विरोध केला होता. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याच्या निर्णयाला काँग्रेसचे नेहमी प्रोत्साहन राहील असे नमूद करुन नामांतराला कडाकडून विरोध दर्शविला आहे. यावरुन आता हा विषय देशव्यापी बनल्याचे अधोरेखित होत आहे.

Visits: 21 Today: 1 Total: 114370

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *