संगमनेरच्या त्र्यान्नव वर्षांच्या पराक्रमी इतिहासाला कलाटणी! पोलीस अधीक्षकांना निवेदन; गोमातेच्या रक्तात भिजलेले पाय रथाला लावू देणार नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणत्या न् कोणत्या कारणांनी सतत चर्चेत असलेल्या संगमनेरात आता इतिहासालाही कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटीशांचा बंदीहुकूम झुगारुन संगमनेरातील झुंजार महिलांनी 93 वर्षांपूर्वी सशस्त्र पोलिसांच्या गराड्यातून हनुमान जन्मोत्सवाचा रथ ओढून नेला होता. त्यानंतर दोन महिने चाललेल्या संघर्षानंतर ब्रिटीश सरकारने संपूर्ण माघार घेत माफीनामा सादर केला व महिला शक्तिचे दर्शन घडविल्याबद्दल प्रातिनिधीक स्वरुपात स्वर्गीय झुंबराबाई अवसक (शिंपी) यांचा साडी-चोळी देवून सत्कार केला. तेव्हापासून दरवर्षीच्या रथोत्सवात पोलिसांकडून वाजतगाजत रथावरील मानाचा ध्वज चढवण्याची परंपराही सुरु झाली. मात्र या परंपरेला यंदा फाटा मिळण्याची शक्यता असून येथील पोलीस अधिकार्‍यांचे पाय गोवंशाच्या रक्तात भिजलेले असल्याने त्यांच्याकडून प्राप्त होणारा मानाचा ध्वज स्वीकारण्यास हनुमान जयंती उत्सव समितीने विरोध दर्शविला आहे. याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांनी पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करुन तालुक्यातील अन्य अधिकार्‍यांना पाचरण करण्याचीही विनंती केली आहे.

संगमनेरच्या हनुमान जयंती रथोत्सवाला मोठा प्रगल्भ आणि पराक्रमी इतिहास लाभला आहे. सन 1927 ते 1929 या तीन वर्षांच्या कालावधीत ब्रिटीश पोलिसांनी या रथोत्सवात विविध अडथळे निर्माण केले होते. 23 एप्रिल 1929 रोजी तर भल्या पहाटेपासूनच पाचशे सशस्त्र ब्रिटीश पोलिसांनी चंद्रशेखर चौकाला वेढा घालीत रथ काढण्यासच मनाई केली. त्यामुळे त्यावर्षी हनुमानाच्या जन्मोत्सवाचा रथ निघणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र पराक्रमाचा मोठा इतिहास असलेल्या संगमनेरातील झुंबराबाई अवसक (शिंपी) या महिलेने पोलिसांचा दबाव झुगारीत हनुमानाची प्रतिमा रथावर बसवली आणि बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे यासारख्या अनेक महिलांनी ‘बजरंग बलि की जय’चा घोष करीत अगदी विद्युत चपळाईने सशस्त्र पोलिसांच्या गराड्यातूनही हा रथ ओढीत थेट रंगारगल्लीपर्यंत नेला.

मात्र तेथेही ब्रिटीशांनी बैलगाड्या आडव्या लावून भडंगबुवांच्या मशिदीसमोरुन रथ नेण्यास मनाई केली. यावेळी निःशस्त्र संगमनेरकर आणि सशस्त्र पोलिसांत मोठा संघर्ष झाला. पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तर नागरिकांनी खोबरे, बत्ताशे आणि गुलालाचा मारा करीत तो परतावूनही लावला. दोन्ही बाजूने सारखा संघर्ष सुरु झाल्याने हनुमान मंदिरापासून सर्व अडथळे झुगारुन निघालेला मारुतीरायाचा हा रथ जवळपास दोन महिने रंगारगल्लीतच खोळंबला होता. मात्र या कालावधीत संगमनेरकरांनी एकोप्याचे दर्शन घडवतांना दोन महिने रंगारगल्लीत उभ्या असलेल्या रथाची पूजा-अर्चना करीत तेथेच ठिय्या देत ब्रिटीशांना जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे ब्रिटीशांना संपूर्ण माघार घ्यावी लागली.

ब्रिटीशांच्या माघारीमुळे हत्तीचे बळ मिळालेल्या संगमनेरकरांनी पुन्हा आमच्या धार्मिक भावनांना नख लागणार नाही अशी हमी मिळाल्याशिवाय रंगारगल्लीतून रथ पुढे नेण्यास विरोध केला. त्यामुळे ब्रिटीशांना लेखी माफीनामा सादर करण्यासह स्त्री शक्तिचे दर्शन घडविल्याबद्दल प्रातिनिधीक स्वरुपात महिलांच्या प्रतिनिधी म्हणून झुंबराबाई अवसक (शिंपी) यांचा साडी व चोळी देवून सन्मान करावा लागला. तसेच, संगमनेरकरांच्या एैक्याचे प्रतिक म्हणून या रथोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांच्या हस्ते वाजतगाजत मिरवणूकीने ध्वज नेवून तो रथावर चढवण्याचा करार झाला. तेव्हापासून हनुमान जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून या हनुमान विजयरथावर ध्वज चढल्याशिवाय येथील रथोत्सवाला सुरुवात होत नाही. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वतः मिरवणूकीने येवून हा ध्वज स्वहस्ते रथावर चढवतात व त्यानंतर हनुमानाची आरती होवून महिलांच्या हस्ते रथाची चाके ओढली जातात.

भाजपाचे शहाराध्यक्ष अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांच्या पत्राने मात्र या 93 वर्षांच्या पराक्रमी इतिहासाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी संगमनेरच्या साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 71 जिवंत जनावरे व काही वाहने असा एकूण एक कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमालही हस्तगत केला होता. या कारवाईत नवाज कुरेशी या कसायाच्या कत्तलखान्यात पोलिसांना रोकडसह काही डायर्‍याही सापडल्या. त्या डायर्‍यांमध्ये कत्तलखाने सुरळीत सुरु राहण्यासाठी कोणाकोणाला हप्ते दिले जात होते त्यांची नावे नोंदविलेली होती. त्यावरुन येथील कत्तलखान्यांना पोलिसांचेच पाठबळ असल्याचेही उघड झाले होते.

हाच धागा पकडून अ‍ॅड.गणपुले यांनी गोवंशाच्या रक्तात ज्यांचे पाय डुंबलेले आहेत अशा अधिकार्‍यांच्या हस्ते आलेला ध्वज स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करीत एकतर तालुक्यातील अन्य पोलीस ठाण्याच्या प्रभार्‍यांना पाचारण करावे अथवा आपण स्वतः या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षी व्हावे अशी गळ घातली आहे. त्यांच्या या पत्रानंतर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनाही सक्रीय झाल्या असून त्यांच्याकडूनही संगमनेरच्या पोलीस अधिकार्‍यांना विरोध होवू लागला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पोलिसांकडून प्राप्त होणारा मानाचा ध्वज येणार की त्याशिवाय रथोत्सवाला सुरुवात होणार अशा चर्चा शहरात रंगल्या आहेत. या ऐतिहासिक उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे आता संगमनेरच्या पंचक्रोशीचे लक्ष्य लागले आहे.

Visits: 143 Today: 1 Total: 1415628

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *