लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे सातव्या दिवशी उपोषण मागे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पिंपळे येथील बेकायदेशीर स्टोन क्रेशरच्या संदर्भात येथील दोन ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.
पिंपळे ग्रामपंचायत समोरील विठ्ठल मंदिरासमोर आण्णासाहेब चकोर आणि रमेश ढोणे या दोन ग्रामस्थांनी  दि. ३० सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले होते. या संदर्भात  उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तपासणी करून दोषी असणाऱ्या सर्व स्टोन क्रेशर धारकांवर कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करावा, असे लेखी आश्वासन तहसीलदार धीरज मांजरे यांनी  नायब तहसीलदार सुभाष कदम यांच्या मार्फत उपोषणकर्त्यांना देण्यात आले.या लेखी आश्वासनानंतर आ. अमोल खताळ यांच्या पत्नी  नीलम खताळ यांच्या हस्ते पिंपळे येथे गेली सात दिवस सुरू असणारे उपोषण लिंबू-पाणी देऊन  मागे घेण्यात आले.
पिंपळे गावातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरासाठी जानकु बाबा ढोणे यांनी २५० एकर जमीन दान दिली. त्यावेळी मंदिर विश्वस्त समिती बनवण्यात आली होती  मात्र कालांतराने या समितीमधील सर्वजण वयोमानानुसार निधन पावले. त्यानंतर या मंदिराची देखभाल करण्याचे काम पिंपळे ग्रामपंचायतीकडे आले.  जमिनीचा परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे पिंपळे ग्रामपंचायतीच्या तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी तब्बल अडीचशे एकर जमीन स्टोन क्रेशरधारकांना विकून टाकली. महसूलची  परवानगी न घेता या गावात मोठ्या प्रमाणात स्टोन क्रेशर सुरू झाले आणि त्याचा फटका गावातील शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे या गंभीर प्रकरणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून पिंपळे ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन दशकांच्या कारभाराची सखोल चौकशी करुन या देवस्थानची लाटलेली २५० एकर जमिन परत मिळवून द्यावी तसेच अनाधिकृत स्टोनक्रेशर धारकांनी महसूलची कुठलीही परवानगी न घेता परस्पर लाखो ब्रासचे उत्खनन  केले. त्या पोटी शासनाची बुडवलेली रॉयल्टी वसुल करावी व या परिसरातील सर्व स्टोन क्रेशर कायम स्वरुपी बंद करावेत अशी मागणी करत गावातील ग्रामपंचायत समोरील विठ्ठल मंदिरासमोर आण्णासाहेब चकोर आणि रमेश ढोणे या दोन ग्रामस्थांनी दि. ३० सप्टेंबर  पासून उपोषण सुरू केले होते.
या उपोषणा संदर्भातील माहिती भाजप अभियंता सेलचे राज्य उपाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी आ.  अमोल खताळ यांना दिली. त्यांनी तात्काळ तहसीलदार धीरज मांजरे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आ. खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, अभियंता शेळके,  हरिश्चंद्र चकोर आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या स्टोन क्रेशरची प्रदूषण महामंडळाच्या विभागाकडून तपासणी करण्यात येईल असे  लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी नीलम खताळ यांच्या हस्ते लिंबू- पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले. यावेळी  पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच  मीना ढोणे,ग्रामविकास अधिकारी, पोलीस अधिकारी,गावातील ग्रामस्थ युवक कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 98 Today: 4 Total: 1103135

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *