महेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी कासट तर सचिवपदी बाहेती यांची निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सेवानिवृत्त झाल्यानंतर आनंदी कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण उभ्या करणार्‍या महेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी रमेशचंद्र कासट यांची तर, सचिवपदी गणेशलाल बाहेती यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेच्या शिस्तीप्रमाणे सर्वमतातून संपूर्ण कार्यकारणी निवडण्यात आली. सदस्यांनी दाखवलेला विश्वास ऊर्जा म्हणून स्विकारीत येत्या वर्षाभरात सदस्यांना आनंदी आणि निरोगी ठेवण्याचे विविध उपक्रम राबविण्यास मानस यावेळी नूतन पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

आजच्या जगात निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवावा असा यक्षप्रश्न अनेकांसमोर असतो. त्यातून काहींची नैराश्याशी गाठ होते, तर काहीजण पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात. संगमनेरातील माहेश्वरी समाजातील सेवानिवृत्तांनी मात्र समाजातील अशा सगळ्या निवृत्तांचा संचय करुन महेश ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. बोलता-बोलता या संघात शेसव्वाशे सदस्य एकत्रित झाले. कार्यमग्नतेच्या कालखंडात आपापल्या क्षेत्रात भरीव आणि कल्पक काम करणार्‍यांचा भरणा असल्याने एकमेकांना आनंद देणार्‍या उपक्रमांची जणू संघात स्पर्धाच निर्माण झाली.

वर्षभर काहीना काही उपक्रमांसोबतच आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन, धार्मिक सहलींचे आयोजन करुन तीर्थाटन करण्याचा अभिनव प्रयोग, ऐतिहासिक व निसर्गसंपन्न ठिकाणांना भेटीचे आयोजन, वर्षभरातील विविध सणउत्सवाच्या निमित्ताने एकत्रित येवून त्यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन अशा एक ना अनेक उपक्रमांनी महेश ज्येष्ठ नागरिक संघ संगमनेरातील सेवानिवृत्तांचा वेगळा संघ ठरला आहे.

दरवर्षी वेगवेगळ्या सदस्यांना नेतृत्त्वाची संधी देवून त्यांच्यातील कल्पकतेचा सदस्यांच्या आनंदासाठी उपयोग करुन घेण्याची परंपरा संस्थेने यंदाही कायम ठेवली. मावळते अध्यक्ष सुरेशचंद्र जाजू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अन्य पदाधिकारी निवडीत उपाध्यक्षपदी अशोक मणियार, सहसचिवपदी बद्रिनारायण लोहे तर कोषाध्यक्षपदी सुभाष दरक यांची निवड करण्यात आली. भंडारी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या या बैठकीत कलाशिक्षक डी.बी.राठी, रामेश्वर लाहोटी, मदनलाल करवा, रामगोपाल पोफळे, विश्वनाथ कलंत्री, रामबिलास मालपाणी, द्वारकानाथ मालाणी, सुभाष नावंदर, द्वारकानाथ बंग, बंग साहेब आदी उपस्थित होते.

Visits: 51 Today: 1 Total: 438205

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *