‘अखेर’ चालकाविरोधात ‘सदोष’ मनुष्यवध! अनुकूल मेंढे मृत्यू प्रकरण; राजापूरचा टेम्पोचालक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साईबाबांच्या दर्शनासाठी आपल्या मित्रासह शिर्डीकडे निघालेल्या संगमनेरच्या अनुकूल सत्यवान मेंढे याचा निळवंडेनजीक अपघात झाला होता. समोरुन येणार्या पिकअप वाहनाची हूल मिळाल्याने घडलेल्या या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत होवून मेंढे ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला होता. सदरचा प्रकार चालकाने आधी झालेल्या वादातून जाणीवपूर्वक केल्याची चर्चाही होती. दैनिक नायकने तशी शंकाही सोमवारच्या वृत्तातून वर्तविली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून जखमी अवधूत जोशी या तरुणाच्या जवाबावरुन राजापूरच्या पिकअप चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत शहरातील घासबाजारात राहणारा अनुकूल हा अवघ्या एकवीस वर्षांचा तरुण मृत्यूमुखी पडल्याने संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त होत होती.

दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शेकडो भाविक पदयात्रेने शिर्डीला जावून साईबाबांचे दर्शन घेतात. त्यानुसार यावर्षी शनिवारी (ता.3) गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने शुक्रवारी दुपारपासूनच शिर्डीकडे जाणार्या निळवंडे-जांभुळवाडी-विमानतळ रस्त्यावर भाविकांची गर्दी दाटली होती. रात्र होताहोता त्यात मोठी वाढ झाली. त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचाही भरणा असल्याने एव्हाना निर्मनुष्य असलेला हा रस्ता ओसंडून वाहत होता. पायी जाणार्या साईभक्तांसाठी जागोजागी फराळ, नाश्ता, चहा-पाणी आदी सोयही अनेकजण करीत असल्याने गुरुपौर्णिमेची या रस्त्यावरील रात्र म्हणजे भक्तिसागरात डुंबलेली असते.

यावर्षी या उत्साहाला मात्र गालबोट लागले. रात्री साडेदहाच्या सुमारास घासबाजारातील दारोळेवाड्यात राहणारा अनुकूल सत्यवान मेंढे (वय 21) हा तरुण आपला मित्र अवधूत वसंत जोशी (वय 23, रा.परदेशपूरा) याच्यासह पल्सर मोटर सायकल (क्र.एम.एच.17/सी.यू.8835) वरुन निळवंडेकडून शिर्डीकडे निघाला होता. त्याची दुचाकी जांभुळवाडीजवळ आली असता समोरुन येणार्या पिकअप (क्र.एम.एच.17/बी.वा हीींिं://ी.वा/य.7189) वाहनाच्या चालकाने चुकीच्या बाजूने येवून त्याला हूल दिली. त्यातून सावरण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक होवून दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. रस्ता वाहता असल्याने जखमींना तत्काळ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र या अपघातातून अनुकूल मेंढे वाचू शकला नाही. डोक्याला गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्राव यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला होता. या अपघातात जखमी झालेला अवधूत जोशी शुद्धीवर येताच पोलिसांनी रुग्णालयात जावून त्याचा जवाब नोंदविला. त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी तालुक्यातील राजापूरात राहणार्या बाळासाहेब नामदेव हासे या पिकअप मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एम. आर. सहाणे करीत आहेत. सोमवारी सायंकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात अनुकूलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

