पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा! लाचलुचपतच्या महासंचालकांकडे तक्रार; निवासासाठी दरमहा पन्नास हजारांचा करतात खर्च..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादग्रस्त ठरलेले संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र संगमनेरच्या सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा ठपका ठेवीत त्यांच्या बेकायदा मालमत्तांची चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडेच तक्रार केली आहे. महासंचालकांनीही सदर प्रकरणी नाशिकच्या एसीबीला चौकशी करण्याच्या सूचना दिल्याने पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गेल्या पंधरा महिन्यांतील विविध घटनांच्या आढाव्यासह पोलीस निरीक्षक आपल्या निवासासाठी पंचतारांकित महागड्या हॉटेलचा वापर करीत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी 13 नोव्हेंबर 2020 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतला. तेव्हापासून ते संगमनेरातील पंचतारांकित हॉटेल
समजल्या जाणार्या पंचवटी गौरव या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. अशाप्रकारे हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेली वरीष्ठांची पूर्वपरवानगीही त्यांनी घेतलेली नाही. सदरील हॉटेलमध्ये एका दिवसाच्या निवासासाठी साधारणतः 1 हजार 700 ते 2 हजार 500 रुपये मोजावे लागतात. पोलीस निरीक्षक देशमुख येथील नियुक्तीपासूनच म्हणजेच गेल्या 15 महिन्यांपासून याच हॉटेलमध्ये रहात असल्याने या कालावधीत प्रतिमाह 51 हजार रुपये याप्रमाणे आत्तापर्यंत त्यांनी केवळ आपल्या निवासासाठीच आठ लाख रुपये खर्च केले आहेत. एका सामान्य पोलीस निरीक्षकाला आपल्या पगारात इतक्या महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्य करता येणे शक्य आहे का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी या हॉटेलमध्ये त्यांचा वावर असल्याचे छायाचित्रही तक्रार अर्जाला जोडले आहे. याशिवाय त्यांनी सदर हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज व त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्याचीही विनंती केली आहे.

याच तक्रार अर्जात खताळ यांनी अनेक गंभीर स्वरुपाचे आरोपही केले असून यापूर्वी शहरातील एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने पोलीस निरीक्षक अवैध व्यावसायिकांकडून दरमहा 55 लाख रुपये हप्ता घेत असल्याची तक्रार नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक व गृहराज्यमंत्र्यांकडे केल्याचा संदर्भही देण्यात आला आहे. तसेच, 2 ऑक्टोबर, 2021 रोजी संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर झालेल्या कारवाईनंतर गोवंश हत्येविरोधात संगमनेरात मोठे आंदोलन उभे राहिले होते. या आंदोलनात विविध हिंदुत्त्ववादी संघटना व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी शहर पोलीस निरीक्षकांना कत्तलखान्यांच्या चालकांकडून दरमहा 27 ते 30 लाख रुपये मिळत असल्याचा आरोप केल्याचेही म्हंटले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संगमनेर पोलिसांना टाळून करण्यात आल्याचे सांगत या कारवाईत दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाल्याचाही उल्लेख निवेदनात आहे.

‘त्या’ कारवाईनंतर काही दिवसांतच संगमनेरातील कत्तलखाने पुन्हा सुरु झाल्याचा दावा करीत शहरात गुटखा, गांजा, वाळू या बेकायदा व्यवसायांविरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरुन पोलीस निरीक्षक भ्रष्टमार्गाचा अवलंब करीत अमाप संपत्ती जमा करीत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या आंदोलनातही त्यांच्या ‘पंचतारांकित’ निवासाचा मुद्दा उपस्थित झाला होता, मात्र आपले राजकीय वरदहस्त प्रबळ असल्याने आपले काहीही ‘वाकडे’ होवू शकत नाही अशी वल्गनाही त्यांनी त्यावेळी केल्याचे खताळ यांनी म्हंटले आहे. आजही संगमनेरचे पोलीस निरीक्षक त्याच हॉटेलात मुक्कामी असून रोजचा नाश्ता, दोनवेळचे जेवण आणि निवास यांचा विचार करता ते दरमहा 75 हजार रुपये खर्च करीत आहेत.

या सर्व घटनाक्रमांवरुन पोलीस निरीक्षक देशमुख पोलीस सेवेत रुजू झाल्यापासूनच आपल्या पदाचा दुरुपयोग करुन बेकायदा संपत्ती जमा करीत असून त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे आपण यासंदर्भात आपल्याकडे तक्रार दाखल करीत असून यानंतर आपल्या जीवितास कोणत्याही स्वरुपाचा धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावरच असेल असेही अमोल खताळ यांनी लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. सदरील तक्रार अर्ज महासंचालकांच्या मुंबई कार्यालयास प्राप्त झाला असून त्यांनी लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना याबाबत योग्य ती चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेरचा पदभार स्वीकारल्यापासूनच ते सतत चर्चेत आहेत. संगमनेरातील गोवंशाच्या कत्तलखान्यांवर झालेल्या सर्वात मोठ्या कारवाईनंतर संगमनेरात मोठे आंदोलन उभे राहीले होते. तेव्हापासून त्यांच्या विरोधात मोठी खदखद निर्माण झाली असून विविध प्रसंगात त्याचे पडसादही दिसून आले आहेत, मात्र याउपरांतही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांच्यावर मोठा राजकीय वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र आता त्यांच्याविरोधात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेच अधिकृत तक्रार दाखल झाल्याने ‘हा’ कथित राजकीय वरदहस्त त्यांना सहीसलामत वाचवतो की त्यांची साथ सोडतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.

