अकोलेतील आदिवासी वाड्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करा! डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष एकनाथ मेंगाळ यांची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये झालेली जीवितहानी अत्यंत वेदनादायक घटना असून अशी घटना अकोले तालुक्यात घडू नये यासाठी तालुक्यातील सर्व दुर्गम वाड्या-वस्त्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करावे. आवश्यकता असल्यास तातडीने उपाययोजना करून संभाव्य घटना टाळण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय.) युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा समशेरपूरचे सरपंच एकनाथ मेंगाळ यांनी केली आहे.
अकोले तालुक्यात अनेक दुर्गम वाड्या-वस्त्या आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पक्के रस्ते नसल्याने पायी चालत जावे लागते. पावसाळ्यात अशा वाड्या-वस्त्यांवर घटना घडल्यास तेथे मदत पोहचविणेही अशक्य होईल अशा ठिकाणी आजही आदिवासी बांधव राहतात. तालुका प्रशासनाने हे वास्तव लक्षात घेऊन अशा दुर्गम वाड्या-वस्त्यांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करण्याची व दुर्गम ठिकाणी राहणार्या आदिवासी श्रमिकांचे सुरक्षित ठिकाणी योग्य पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यात सध्या उपजिल्हा रुग्णालय आणण्याची चर्चा सुरु आहे. असे झाले तर त्याचे स्वागतच आहे. मात्र याबरोबरच तालुक्यात आदिवासी भागातील आज अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य तपासण्याची आवश्यकता आहे. येथे नियुक्तीला असलेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मुख्यालयात राहतात का? या आरोग्य केंद्रांमध्ये औषधे उपलब्ध आहेत का? हे प्रथम तपासण्याची आवश्यकता आहे. दुर्गम भागात सर्पदंशाची औषधे व उपचार व्यवस्था नसल्याने आदिवासी बांधवांना सर्पदंश झाल्यास जीव गमवावा लागतो किंवा महागड्या उपचारांसाठी आयुष्यभर कर्जबाजारी व्हावे लागते. पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण आदिवासी भागात वाढत असल्याने या सर्व भागांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहतील व सर्पदंशासह इतर उपचारांच्या व्यवस्था ग्रामीण भागात श्रमिकांना मिळतील यासाठी प्रशासनाने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तहसीलदारांनी ही सर्व परिस्थिती पाहता, आरोग्य विभाग, महसूल विभाग व आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील संबंधित सर्व विभागांची एकत्र बैठक घेऊन तालुक्यात कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी डीवायएफआयच्यावतीने मेंगाळ यांनी केली आहे.