जिल्ह्यातील शाळांचा फैसला मंगळवारच्या बैठकीत! कोविडचा प्रसारवेग 22 टक्क्यांहून अधिक; धोरणांची विसंगतीही संभ्रम वाढवणारी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र शाळा सुरु करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेली नियमावली आणि रविवारी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यात मोठी विसंगती असल्याने शाळा आणि पालक अशा दोहींमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवून सक्रीय रुग्णांची संख्याही अकरा हजारांच्या घरात पोहोचल्याने व जिल्ह्याचा रुग्ण समोर येण्याचा सरासरी वेगही 22 टक्क्यांच्या पुढे गेल्याने जिल्ह्यातील शाळा अद्यापही बंद आहेत. मंगळवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होत असून त्यातूनच जिल्ह्यातील शाळांचे पुढील भवितव्य निश्चित होण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही जिल्हे व शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यासमोर ठेवला होता. त्याला त्यांची संमती मिळाल्यानंतर गेल्या गुरुवारी (ता.20) शिक्षण विभागाने राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा सर्वाधिकार स्थानिक प्रशासनावर सोपविला. त्यानुसार रुग्णसंख्या कमी झालेल्या मुंबईसह ठाणे, नाशिक, लातूर, वर्धा व नांदेड येथील पहिलीच्या वर्गापासूनच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत, तर कोल्हापूरमधील शाळा मंगळवारपासून सुरु होणार आहेत. पुण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होणार असून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या आहेत, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ दहावी व बारावी तर पालघर व धुळे जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अहमदनगरसह नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यांतील शाळा सुरु करण्याबाबत शासनस्तरावरुन कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून स्थानिक पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार तेथील प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासह वर्गातील एखादा विद्यार्थी बाधित झाल्यास त्याच्या शेजारी बसणार्‍या केवळ एका विद्यार्थ्याचे विलगीकरण करण्याची सूचना दिली होती. मात्र रविवारी (ता.23) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांनी एखाद्या वर्गात बाधित आढळल्यास तो संपूर्ण वर्गच बंद करण्याची घोषणा केल्याने शाळा व्यवस्थापन आणि पालक अशा दोहींचाही मोठा गोंधळ उडाला असून संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील दोन आठवड्यांची कोविडस्थिती लक्षात घेता राज्यातील काही जिल्ह्यात बाधितांचे आकडे स्थिरावले आहेत, तर काही जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत मोठी घटही झाली आहे. अहमदनगर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला असून गेल्या 5 जानेवारीपासून जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुक्यांमधील संक्रमणाची गती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्ह दरही 22 टक्क्यांहून अधिक आहे. त्यातही अहमदनगर महापालिका क्षेत्रात गेल्या 24 दिवसांत सरासरी 213 रुग्ण या गतीने 5 हजार 102, राहाता तालुक्यात सरासरी 55 रुग्ण या गतीने 1 हजार 309 रुग्ण, नगर तालुक्यात सरासरी 45 रुग्ण या गतीने 1 हजार 88 तर श्रीरामपूर व अकोले तालुक्यात सरासरी 34 याप्रमाणे प्रत्येकी 820 रुग्ण आढळले आहेत. संगमनेर तालुक्याचा सरासरी रुग्णवाढीचा दर मात्र नियंत्रणात असून तालुक्यातून आत्तापर्यंत सरासरी 19 रुग्ण या गतीने अवघे 460 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक भागातील कोविडची स्थिती आजही चिंताजनक असल्याने व त्यातच सक्रीय रुग्णांची संख्याही 11 हजारांच्या आसपास असल्याने जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. उद्या मंगळवारी (ता.25) जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतच जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एकीकडे शाळा सुरु करण्याबाबत मागणी होत असतांना, दुसरीकडे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रासह आठ तालुक्यांतील सरासरी रुग्णगती 20 हून अधिक असल्याने मंगळवारच्या बैठकीत काय फैसला होतो याकडे जिल्ह्यातील शाळा, पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


जिल्ह्यात आज साडेनऊशे बाधित..
अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वाढलेले संक्रमण अजूनही उंचावलेलेच असले तरीही आज एकूण रुग्णसंख्येत मात्र काहीशी घट झाली आहे. आज जिल्ह्यातील 951 जणांना कोविडची लागण झाली असून त्यात सर्वाधिक 324 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातील आहेत. अकोले 82, नगर तालुका 72, श्रीरामपूर 49, इतर जिल्ह्यातील 45, पाथर्डी व राहुरी प्रत्येकी 43, संगमनेर व राहाता प्रत्येकी 39, श्रीगोंदा 38, शेवगाव व जामखेड प्रत्येकी 35, नेवासा 34, पारनेर 27, लष्करी रुग्णालय 18, कोपरगाव 13, कर्जत 9, भिंगार लष्करी परिसरातील चार व इतर राज्यातील दोघा रुग्णांचा त्यात समावेश आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 79909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *