आश्वी बुद्रूकमध्ये विरोधकांकडून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न! सरपंच महेश गायकवाड यांचा आरोप; विरोधकांवर केली सडकून टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अमरेश्वर सेवा मंडळाच्यावतीने विरोधकांच्या बेछूट आरोपांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. यावेळी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरपंच महेश गायकवाड यांनी विरोधक गावात जातीय तणाव निर्माण करून गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. गावात सर्वाधिक विकासकामे योग्य त्या कायदेशीर मार्गाने सुरू असल्याने आणि त्यावर सर्वसामान्य जनता खूश असल्यानेच विरोधकांना पोटशूळ उठला असल्याचे ते म्हणाले.

सरपंच महेश गायकवाड म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आश्वी बुद्रूक येथे मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून त्यात गावातील रस्ते, शॉपिंग सेंटर, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, गाळे बांधकाम, सार्वजनिक शौचालय, मुतारी यांसारख्या असंख्य विकासकामांचा समावेश आहे. मुळात ज्यांनी गावाच्या पाणी योजनेसाठी आलेले दोन कोटी रुपये भ्रष्टाचार करून स्वतःच्या खिशात लोटले त्यांना ही विकासकामे सहन होत नसल्याने त्यांचा आटापिटा सुरू आहे. कोणतीही विकासकामे ही ग्रामसभेच्या माध्यमातून पार पाडली जातात. परंतु आमचे विरोधक मात्र जनता त्यांना पाणी योजनेचा हिशोब विचारतील या भीतीने कधीही ग्रामसभेला फिरकत नसतात. मग त्यांना ग्रामसभेत काय चालू आहे कसं समजणार? मुळात आश्वि सारख्या मोठ्या गावात ग्रामसभा आयोजन करण्यापूर्वी लाऊडस्पिकर वर दवंडी देऊन रीतसर प्रसिद्धी देऊन ग्रामसभेचे आयोजन केले जाते. मग अशावेळी सभेला यायला विरोधकांना अडवले कुणी? लकी ड्रॉसाठी गोळा केलेला एक ना एक रुपया हा बँक खात्यात सुरक्षित असून कोरोना कालखंडात लॉकडाऊनमुळे सोडत जाहीर करण्यास उशीर झाला. परंतु यामध्ये आयोजकांचा कोणत्याही स्वरूपाचा दोष नसून लवकरच लकी ड्रॉचे नियोजन जाहीररित्या फ्लेक्सवर सार्वजनिकरित्या घोषित करणार असून पै ना पै चा हिशोब देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विरोधक हे जातीयवाद करत असून ज्यांनी ह्या देशाचे संविधान लिहिले त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवंदना स्तंभाच्या प्रस्तावित कामास जातीयवादी मानसिकतेतून विरोध करत असून हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. मुळात गावात जातीय सलोखा आणि शांतता राखण्यासाठीच स्तंभ असणे आवश्यक आहे. परंतु आता मात्र विरोधक त्याला अतिक्रमण हे गोंडस नाव देऊन जातीयवादाचा छुपा अजेंडा चालवत आहेत.

स्मशानभूमी विकासकामांसाठी आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच ग्रामपंचायत वित्त आयोगाच्या माध्यमातून 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून गेल्या 40 वर्षांपासून स्मशानभूमी अत्यंत खराब अवस्थेत होती. विरोधक जेव्हा 40 वर्षे सत्तेत होते, तेव्हा का नाही त्यांना ही दुर्गंधी किंवा कचरा दिसला? मुळात त्या स्मशानभूमीत कचरा टाकण्याची सुरुवातच ह्या विरोधकांकडे सत्ता असताना झाली होती मग त्यांनी ह्या घटनेला त्याचवेळी विरोध का केला नाही? तसेच जीर्ण व धोकादायक झालेली नारळाची झाडे काढण्यासाठी रीतसर परवानगी घेऊनच काम सुरू असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले. गावातील सर्व अवैध धंदे हे विरोधकांच्या आशीर्वादाने छुप्या पद्धतीने सुरू असून त्यावर लवकरच पोलिसांत रीतसर निवेदन देऊन कारवाईची मागणी आक्रमकरित्या करणार आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने निसटते बहुमत देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याने त्यांचा जळफळाट सुरू असून यापुढे जनता पाण्यासारख्या पुण्याच्या योजनेत भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशांची लूट करणार्‍या जातीवादी मानसिकतेच्या लोकांना पुन्हा कधीही सत्तेत बसू देणार नसल्याचा इशारा सरपंच महेश गायकवाड यांनी दिला आहे.

Visits: 123 Today: 1 Total: 1418616

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *