संगमनेरात पुन्हा जातीय तणाव..! तरुणीसह तिच्या पित्याला बेदम मारहाण; संतप्त नागरिकांचा बायपास वर ठिय्या..
नायक वृत्तसवा, संगमनेर
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत किरकोळ कारणावरुन दोन समाजात तणाव निर्माण करणारी संतापजनक घटना संगमनेरातून समोर आली आहे. या घटनेत दुचाकीवरुन जाणाऱ्या बाप-लेकीला कट मारल्याचा जाब विचारल्याने एका मुस्लिम तरुणाने तरुणीसह तिच्या पित्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर निंभाळे परिसरातील नागरिकांनी मारहाण झालेल्या दोघांच्या कुटुंबीयांसह बायपास चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ व मनसेचे उमेदवार योगेश सूर्यवंशीही सहभागी झाल्याने मोठी गर्दी झाली होती. यावेळी तरुणांमधून घोषणांसह आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली गेली. पोलिसांनी शोध पथके पाठवल्याचे व लवकरच आरोपीला अटक होईल असे वेळोवेळी आश्वासनही देऊन पाहिले, मात्र संतप्त जमावाने त्याकडे दुर्लक्ष करीत जवळपास तीनतास नगर-पुणे बायपास मार्ग रोखून धरला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे-संगमनेर रस्त्यावरील निंभाळे बायपास चौफुलीवर घडली. निंभाळे येथे राहणारी वीस वर्षीय तरुणी पुण्यात शिक्षण घेते. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने ती आज सकाळी आपल्या पित्यासह दुचाकीवरुन पुण्याला जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकाकडे निघाली होती. यावेळी पाठीमागून मोटर सायकल वरुन आलेल्या आयान असिफ बेग नावाच्या मुस्लिम तरुणाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या तरुणीने चालू दुचाकीवरुनच त्याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने त्याने चौफुलीजवळ थेट त्यांच्या दुचाकीला आपले वाहन आडवे लावून तरुणीला मारहाण केली. यावेळी तिच्या पित्याने आपल्या मुलीला वाचवताना त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही जबर मारहाण केली.
हा प्रकार सुरु असतानाच आसपासचे नागरिक जमा होऊ लागल्याने परिसरात असलेल्या एका दुकानदाराने आरोपीला फकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याऐवजी त्याला तेथून पळून जाण्यास मदत केली. त्यानंतर संतप्त झालेल्या निंभाळे येथील ग्रामस्थांसह संगमनेरातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्ववादी कार्यकर्ते निंभाळे चौफुली येथे पोहोचले व त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह पुणे-नगर बायपास मार्गावरील चौफुलीवर आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महायुतीचे उमेदवार अमोल खताळ व मनसेचे उमेदवार योगेश सूर्यवंशी दोघेही आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले.
तरुणांची गर्दी वाढू लागल्याने घोषणाबाजी सुरु झाली. त्यातच पोलीस पीडित मुलीच्या वडिलांशी चर्चा करीत असतानाच संतप्त झालेल्या तरुणांच्या एका गटाने आरोपीला घटनास्थळावरुन पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्या दुकानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जागृत ग्रामस्थ व पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. यानंतर आंदोलकांनी सर्वांना शांततामय मार्गानेच आंदोलन करण्याची सूचना दिल्याने तणावपूर्ण शांतता निर्माण झाली. यावेळी पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह आयटीबीपीचे जवान व शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या प्रकाराने यापूर्वी नेहमीच चर्चेत राहिलेला जोर्वे रस्ता आणि निंभाळे चौफुली ऐन निवडणुकीत चर्चेत आली असून यापुढील काळात त्यावरुन राजकारण रंगण्याची दाट शक्यता आहे..
Visits: 43 Today: 2 Total: 105219