कॅफे हाऊसच्या ‘आडोशा’ला विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे! गोंडस नावाखाली नंगानाच सुरुच; संगमनेर पोलिसांनी सहा जोडप्यांना रंगेहाथ पकडले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळा-महाविद्यालयाच्या नावाखाली घरातून निघालेल्या विद्यार्थ्यांना सहजतेने एकोपा मिळवून देत त्यांना अश्लील कृत्य करण्यास प्रेरीत करणारे गोंडस नावाचे ‘कॅफे हाऊस’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्यंतरी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ‘पोक्सो’च्या प्रकरणात नाव आलेल्या कॅफेचालकांना सहआरोपी करण्याचा धडाका लावला होता. त्यातील अनेकांना महिनाभर कारागृहातही सडावे लागले. त्यामुळे अशाप्रकारांना आळा बसला असेल अशी अपेक्षा असताना गुरुवारी ती फोल ठरवणारी घटना समोर आली. शहर पोलिसांनी रहाणेमळ्यातील ‘रिलॅस कॅफे’ नावाच्या अशाच अश्लील कृत्याच्या केंद्रावर छापा घातला. यावेळी आतील आडोशांना सहा जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. त्या सर्वांसह कॅफेचालक अभय गवळी याच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन रंगेहाथ पकडलेल्या सहा जोडप्यांना समज देवून सोडण्यात आले आहे.
गुरुवारी (ता.२८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रहाणेमळ्यातील या अश्लील कृत्यासाठी मशहूर असलेल्या केंद्रावर अचानक विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी दिसू लागली. त्यामुळे काही जागरुक नागरिकांना संशय आला. यापूर्वी अशा ठिकाणी काय चालते याबाबत वेळोवेळी चर्चा झालेल्या असल्याने संबंधिताने याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. त्यांनीही तत्काळ दखल घेत ‘रिलॅक्स’ या गोंडस नावाने सुरु असलेल्या या अश्लील केंद्रावर छापा घातला. यावेळी पोलिसांना आतील बाजूस अगदी शारीरिक संबंध प्रस्थापित करता येतील इतका एकोपा असलेले कप्पे दिसून आले. त्यातील सहा कप्प्यांमध्ये सहा जोडपी आक्षेपार्ह कृत्य करतानाही दिसले.
पोलिसांना पाहताच अनेकांची धांदल उडाली, काही मुली रडायला लागल्या आणि त्यांना आपल्या कृत्याची जाणीवही झाली. पोलिसांनी त्या सर्वांना आपले चेहरे झाकण्यास सांगून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रिलॅक्स कॅफेचा चालक अभय चंद्रकांत गवळी (वय १९, रा. कासारवाडी) याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरील कॅफे चालक आतील भागात तयार केलेल्या कप्प्यांसाठी वापरानुसार पैसे आकारीत होता. पोलिसांनी कारवाई करताना आतील संपूर्ण भागाची पाहणी केली, त्यावेळी वापरलेले कंडोमही आढळून आले. त्यावरुन अशा ठिकाणांवर काय चालते याचाही प्रत्यय आला. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी चाळीसगावच्या आमदारांनी स्वतः पोलिसांच्या उपस्थितीत तेथील एका कॅफे हाऊसची तोडफोड केली होती. तेथेही अशाचप्रकारे विद्यार्थी अश्लील कृत्य करताना आढळून आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार महोदयांनी पोलिसांची कारवाई सुरु असतानाच त्या कॅफेची मोडतोड केली. संगमनेरात असा प्रकार अशक्य आहे. मात्र, शहराचे सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे, त्या पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेवून अशा संशयित ठिकाणांवर वारंवार छापे घालण्याची आणि तपासणी करण्याची गरज आहे. पालकांनीही या घटना गांभीर्याने घेवून आपला पाल्य शाळा, महाविद्यालय अथवा शिकवणीसाठीच जातोय का याची एकदातरी तपासणी करण्याची आवश्यकता आहे.