संगमनेरच्या शारदा पतसंस्थेची निवडणूक बिनविरोधकडे! इतर दोन जागांसाठी पाचजणांचे अर्ज; आजपासून माघारीची प्रक्रिया..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत आघाडीच्या मानल्या जाणार्या शारदा नागरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधच्या दिशेने झुकली आहे. संचालक मंडळातील 17 जागांसाठी जाहीर झालेल्या या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 20 जणांनी उमेदवारी दाखल केली. त्यात सर्वसाधारण गटातील बारा जागांसह महिला मतदारसंघाच्या दोन आणि इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी अतिरीक्त अर्ज दाखल झाले नाहीत. त्यामुळे 15 जागांचे निकाल निश्चित झाले असून आता केवळ भटक्याजाती-विमुक्त जमाती व अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघाच्या दोन जागांसाठी पाच उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत. त्यामुळे सामोपचारातून एकमत झाल्यास यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

दिवंगत उद्योगपती माधवलाल मालपाणी यांनी आपल्या तत्कालीन सहकार्यांसह तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या शारदा नागरी पतसंस्थेने संगमनेरच्या बाजारपेठेची भरभराट होण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ही संस्था व्यापार्यांच्या शिरोभागी राहीली आहे. आजमितीस 225 कोटींच्या ठेवींसह 155 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणार्या या संस्थेकडून ठेवीदार, ग्राहक आणि जवळपास बावीसशेहून अधिक सभासदांना राष्ट्रीयस्तरावरील बँकांच्या धरतीवरील विविध सुविधा पुरवल्या जातात. त्यातून आर्थिक सहकार क्षेत्रातील आघाडीची प्रगत संस्था म्हणूनही शारदा पतसंस्थेने आपला स्वतंत्र दबदबा निर्माण केला आहे.

विद्यमान संचालकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सहकार खात्याने संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 6 ते 13 मे दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले व 14 मे रोजी छाननी करण्यात आली. छाननीनंतर सर्वसाधारण गटातील 12, महिला राखीव गटातील दोन आणि इतर मागासप्रवर्गासाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने या तिनही गटातील 15 जागा बिनविरोध झाल्याचे निश्चित आहे. त्यात सर्वसाधारण गटात गिरीश मालपाणी यांच्यासह सुमीत अट्टल, रोहित मणियार, राजेश रा.मालपाणी, अमर झंवर, आदित्य राठी, सीए. संकेत कलंत्री, श्रेणीक आसावा, डॉ.योगेश भुतडा, ओंकार इंदाणी, राजेश लाहोटी व कैलास राठी यांची, महिला राखीव गटात कल्पना राठी व रतिका बाहेती यांच्यासह इतर मागासप्रवर्गात जगदीश टोकसे यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे.

राखीव असलेल्या इतर दोन प्रवर्गातील भटक्या जाती-जमाती व विमुक्त जमाती प्रवर्गात एका जागेसाठी विद्यमान संचालक सोमनाथ कानकाटे यांच्यासह प्रसाद भडांगे व ज्ञानेश्वर नाईक या तिघांचे तर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात विद्यमान संचालक सागर वाकचौरे यांच्यासह अभिषेक वाकचौरे यांचा अर्ज कायम आहे. या दोन्ही प्रवर्गातील इच्छुकांमध्ये एकमत झाल्यास यंदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून सभासदांमधूनही अवघ्या दोन जागांसाठी निवडणुकीचा खर्च होवू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार आजपासून 29 मे पर्यंत अर्जमाघारीची मुदत असून 7 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. संगमनेरचे सहकार उपनिबंधक संतोष कोरे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघत आहेत.

