तेरुंगणमध्ये घरफोडी करणार्यास राजूर पोलिसांनी केले गजाआड! अवघ्या बारा तासांत चोरीचा छडा लावल्याने नागरिकांतून कौतुक..
नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यांतील गावांत ऐन सणासुदीत चोरी करणार्या एका चोरट्याला राजूर पोलिसांच्या पथकाने अवघ्या बारा तासांत मुद्देमालासह गजाआड केले आहे. या धडाकेबाज कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत असून, यापुढेही पोलिसांनी असेच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्रीचे 8 वाजेच्या दरम्यान तेरुंगण गावातील बाळू भागा चौधरी यांच्या घराचा अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडून घरातील मातीच्या कोठीत ठेवलेले 22 हजार रुपये किंमतीच्या अर्धा अर्धा तोळ्याच्या दोन नथी, 33 हजार रुपये किंमतीच्या दीड तोळा वजनाच्या चार पुतळ्या व एक पान, 10 रुपये किंमतीच्या अर्धा किलो वजनाचे चांदीचे एळा असा एकूण 65 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबविला होता.
या प्रकरणी बाळू चौधरी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुरनं.189/2021 भादंवि कलम 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपास करत असताना गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही घरफोडी मारुती रामा कातडे (वय 25, रा.तेरुंगण) याने केली आहे. त्यानुसार अवघ्या बारा तासांत त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोहेकॉ.भांगरे, पोना.देवीदास भडकवाड, पोकॉ.अशोक गाढे, प्रवीण थोरात यांनी केली असून पुढील तपास पोना.भडकवाड हे करीत आहे.