अकोले नगरपंचायतीवर पिचड पिता-पुत्रांचेच वर्चस्व! राष्ट्रवादी-शिवसेनेच्या आघाडीसह काँग्रेसचा उडवला धुव्वा

नायक वृत्तसेवा, अकोले
विविध राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोप आणि ऐनवेळी महाविकास आघाडीचा तुटलेला संसार अशा नाट्यमय घडामोडींनी रंगलेल्या अकोले नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांनी बाजी मारली आहे. येथील एकूण सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने विद्यमान आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला धुळ चारीत तब्बल बारा जागा पटकाविल्या आहेत. तर आघाडीतील या दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लावणार्‍या या निवडणुकीत माजी आमदारांची सरशी झाली आहे.

ओबीसी आरक्षित चार जागांसाठी महिनाभर लांबलेल्या अकोले नगरपंचायतीच्या राहिलेल्या जागांवर काल मतदान झाल्यानंतर आज एकूण सतरा जागांवर झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात आली. या प्रक्रियेत सुरुवातीपासून माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्त्वाखालील भाजापाने वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले. या विजयाने अकोले नगरपंचायतीवर आपला गड शाबूत ठेवण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले असून या निवडणुकांचे निकाल स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे ठरत आहेत.

आज सकाळी सुरू झालेल्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक एकमधून शिवसेनेच्या विमल संतू मंडलिक (416) यांनी काँग्रेसच्या अलका अशोक मंडलिक (245) यांचा 171 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार सुरेखा पुंजा मंडलिक यांना केवळ 10 मते मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपाच्या सागर निवृत्ती चौधरी (169) यांनी काँग्रेसच्या सागर विनायक चौधरी (166) यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या शिवाजी आनंदा चौधरी यांना 84 मते पडली. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाच्या प्रतिभा वसंत मनकर (481) यांनी राष्ट्रवादीच्या मंदा तान्हाजी पांडे (254) यांचा तब्बल 227 मतांनी पराभव केला. मनसेच्या जयश्री दत्तात्रय नवले यांना 51 तर शिवसेनेच्या ठकुबाई पोपट शिंदे यांना अवघी सहा मते मिळाली.

प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपाचे हितेश रामकृष्ण कुंभार (250) यांनी काँग्रेसचे फैजान शमशुद्दीन तांबोळी (153) यांचा 97 मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या श्रीकांत सुधाकर मैड यांना 124 तर अपक्ष उमेदवार योगेश मुकुंद जोशी यांना 94 मते मिळाली. प्रभाग क्रमांक पाचमध्ये भाजपाच्या सोनाली लक्मीकांत नाईकवाडी (416) यांनी शिवसेनेच्या गणेश भागुजी कानवडे (346) यांचा 70 मतांनी पराभव केला. मनसेच्या हर्षल रमेश गुजर यांना केवळ सात मते पडल्याने त्यांची अनामत जप्त झाली. प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीच्या श्वेताली मिलिंद रुपवते (346) यांनी भाजपाच्या शैला विश्वनाथ घोडके (290) यांचा 73 मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या कांचन किशोर रुपवते यांना 28 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक सातमधून राष्ट्रवादीच्या आरिफ शमशुद्दीन शेख (393) यांनी भाजपाच्या मैनुद्दीन बद्रोद्दीन शेख (296) यांचा 97 मतांनी पराभव केला. माकपच्या सचिन सदाशिव ताजणे यांना 90 मते मिळाली. प्रभाग आठमध्ये भाजपाच्या बाळासाहेब काशिनाथ वडजे (557) यांनी राष्ट्रवादीचे अशोक दत्तू गायकवाड (288) यांचा विक्रमी 329 मतांनी पराभव केला. शिवसेना बंडखोर उमेदवार जयराम विठोबा गायकवाड यांना 48 तर मनसेच्या शिवाजी रामनाथ गायकवाड यांना 20 मते मिळाली. प्रभाग नऊमध्ये भाजपाच्या शीतल अमोल वैद्य (347) यांनी राष्ट्रवादीच्या भीमा बबन रोकडे (216) यांचा सरळ लढतीत 131 मतांनी पराभव केला.

प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेनेचे नवनाथ विठ्ठल शेटे (137) अवघ्या 45 मतांनी विजयी झाले. भाजपाचे अनिल गंगाधर नाईकवाडी व राष्ट्रवादीचे बंडखोर संदीप भाऊसाहेब शेणकर या दोघांनी प्रत्येकी 92 तर काँग्रेसचे मयूर शेटे यांनी 62 व अपक्ष प्रकाश संपतराव नाईकवाडी यांनी अवघी चार मते मिळविली. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपाच्या वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (258) यांनी राष्ट्रवादीच्या वंदना भागवत शेटे (251) यांचा अवघ्या सात मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या वनिता रामदास शेटे यांना 140 मते मिळाली. प्रभाग क्रमांक बारा मधून भाजपाच्या तमन्ना मोहसीन शेख (423) यांनी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार अनिता शरद पवार (187) यांचा 236 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या निलोफर गफ्फार कुरेशी यांना 99 तर काँग्रेसच्या सुमन सुरेश जाधव यांना 24 मते मिळाली.

प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपाच्या जनाबाई नवनाथ मोहिते (268) यांनी राष्ट्रवादीच्या आरती सुरेश लोखंडे (216) यांचा 52 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक चौदामधून भाजपाचे शरद एकनाथ नवले (267) अवघ्या 15 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र यादव नाईकवाडी (252) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या पांडुरंग बाबुराव डमाळे यांना 188 मते मिळाली. प्रभाग क्रमांक पंधरामधून काँग्रेसच्या प्रदीपराज बाळासाहेब नाईकवाडी (322) यांनी भाजपाचे सचिन संदीप शेटे (190) यांचा 132 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या संतोष कारभारी नाईकवाडी यांना 97 व शिवसेना बंडखोर उमेदवार अजय भिमराज वर्पे यांना अवघी तीन मते मिळाली.

प्रभाग क्रमांक सोळामधून भाजपाच्या माधुरी रवींद्र शेणकर (147) यांनी काँग्रेसच्या मीना प्रकाश भांगरे (142) यांचा अवघ्या पाच मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या पूजा तुकाराम भांगरे यांना 92 मते मिळाली. तर प्रभाग क्रमांक सतरा मध्ये भाजपाच्या कविता परशुराम शेळके (291) यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादीच्या आशा रवींद्र पानसरे (156) यांचा 135 मतांनी पराभव केला. एकंदरीत अकोले नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांच्या नेतृत्त्वाखालील सत्ताधारी भाजपाने आपला गड शाबुत ठेवताना तब्बल बारा जागा मिळवित निर्विवाद बहुमतही प्राप्त केले.


एकूण सतरा जागांसाठी दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेसह आघाडी केली होती, तर काँग्रेसने स्वबळ अजमावले होते. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सतरातील बारा जागा मिळविल्या. यातील पराभूत पाचपैकी चार ठिकाणी भाजपा दुसर्‍या क्रमांकावर आहे. प्रत्येकी सहा ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी तर एका ठिकाणी शिवसेना व एका ठिकाणी बंडखोर दुसर्‍या स्थानी आहे. सतरा जागांच्या अकोले नगरपंचायतीत आता सत्ताधारी भाजपाचे 12, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक सदस्य असणार आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 121193

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *