अजित पवार गटावर हेरंब कुलकर्णींनी केली कठोर शब्दांत टीका अधिक कांगावा ऐकून न घेता ‘त्या’ बारा प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

नायक वृत्तसेवा, अकोले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे भाजपप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. राष्ट्रवादीतील या फुटीमुळे पक्षातील बहुतांश नेते हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. पक्षातील नेते छगन भुजबळ, आमदार अमोल मिटकरी हे नेहमी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविरूद्ध भूमिका घेणारे नेतेही अजित पवारांसोबत गेले. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार गट) काही जणांकडून टीका करण्यात येत आहे. अकोलेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पुरोगामी चळवळीचे महत्त्वपूर्ण चेहरा असलेले हेरंब कुलकर्णी यांनी भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राष्ट्रवादीवर टीका करत त्यांनी एकूण 12 प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजप सोबत गेल्यापासून छगन भुजबळ, अमोल मिटकरी यांची त्या सत्तालोलुप निर्णयाला तात्त्विक झालर देण्याची केविलवाणी धडपड संतापजनक आहे. भुजबळ यांनी तर महात्मा फुले व आंबेडकर यांचे चुकीचे दाखले दिले व त्यांनीच सत्ता मिळवावी, असे विधान करून त्या महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा अधिक कांगावा ऐकून न घेता काही प्रश्नांची उत्तरे हे नेते भेटतील तिथेच त्यांना काही प्रश्न विचारले पाहिजे, असे म्हणत हेरंब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकूण 12 प्रश्न विचारले आहेत. (1) केवळ महाराष्ट्रपुरते नाही तर मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा देत त्यांचे कौतुक अजितदादा यांनी केले आहे. या मोदी सरकारच्या काळात मॉब लिंचींगमध्ये गरीब मुस्लिमांना मारलेल्या गुंडांना सरकारने पाठिशी घातले, त्याविषयी तुम्हांला काय म्हणायचे आहे? (2) संजीव भट, उमर खालिद, भीमा-कोरेगावमधील सामाजिक कार्यकर्ते यांना ज्या अन्यायकारक रितीने तुरुंगात टाकले आहे. ते राष्ट्रवादी पक्ष म्हणून तुम्हांला मान्य आहे का? त्याचे तुम्ही समर्थन करत आहात का? (3) नवाब मलिक हे तुमचेच सहकारी असून त्यांना जामीनही मिळू दिला जात नाही त्याविषयी हा सूड आहे असे वाटते आहे का? (4) बिल्कीस बानोचे आरोपी सोडून दिले, त्यांचे सत्कार झाले. हाथरस ऊन्नाव येथील पीडितेचे जगणे मुश्किल केले. महिला पहिलवानांचे चारित्रहनन केले, या सर्व प्रकरणात आरोपी पाठिशी घातले गेले. महिला धोरण आणलेल्या पक्ष विचारांचे वारसदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? याचा तुम्ही धिक्कार करणार का? ब्रिजभूषणची हकालपट्टी झाल्याशिवाय एनडीएत सामील होणार नाही अशी भूमिका घेणार का?

(5) धार्मिक दंगली करून राम मंदिर आंदोलन ज्यांनी चालवले, मुंबईत भीषण दंगली झाल्या शेकडो जीव गेले. रामाचा राजकीय वापर केला त्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दंगली केलेल्या भाजप सोबत सहभागी होणार का? (6) महात्मा फुलेंचा अपमान केलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भिडे गुरुजी यांनी वादग्रस्त विधाने केल्यावर भाजपाने पाठिशी घातले. भाजपने निषेधही केला नाही. किमान पहिल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी नाराजी तरी व्यक्त केली आहे का? (7) नांदेडच्या अनुसूचित जाती वर्गातील तरुणाचा खून झाल्यावर भाजप सरकारचा एकही मंत्री त्या कुटुंबाला भेटायला गेला नाही. याबद्दल काही जाब विचारणार का? तुमचे मंत्री तरी भेट देतील का? (8) 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणारी नॅचरल करप्ट पार्टी असे जाहीर बोललेल्या नरेंद्र मोदी यांनी ते विधान अजूनही मागे घेतलेले नाही. याबद्दल त्यांना जाब विचारणे, खुलासा करणे किंवा मिटवून घेणे यापैकी नेमके काय करायचे ठरले आहे?

(9) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत मानत आहोत असे म्हणत असाल तर या सरकारने पाठ्यपुस्तकातून लोकशाही हा पाठ हटवला, सामाजिक चळवळी, वैज्ञानिक धडे हटवून इतर अंधश्रद्धा वाढवणारे पाठ आणत आहेत. पक्ष म्हणून एनडीएच्या पहिल्या बैठकीत आपली भूमिका मांडणार आहात का? (10) महात्मा गांधी हे जर तुमचे आदराचे स्थान असेल तर नथुरामचा गौरव करणार्या प्रज्ञासिंगवर पक्षाने कारवाई करावी, पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका घेणार का? (11) भाजपच्या कल्पनेतील हिंदुस्थान व फुले-आंबेडकर यांच्या कल्पनेतील संविधानाने निर्माण केलेला बहुविध भारत हे एकच आहेत अशी पक्षाची भूमिका आहे का? नसेल तर त्या भूमिकेला विरोध कसा नोंदवणार आहात व भाजप ती भूमिका सोडणार नसेल तर तुम्ही भाजपला सोडणार आहात का? (12) ज्या फुले-शाहू-आंबेडकर यांनी वर्णव्यवस्था नाकारली त्याच उच्च नीच व्यवस्थेचे उदात्तीकरण करणार्या ग्रंथांना,संस्थांना प्रतिष्ठा देणार्या भूमिका थेट फुले आंबेडकर विरोधी आहेत हे म्हणण्याचे धाडस तुम्ही दाखवणार आहात का? की फुलेवाडा व रेशीमबाग एकाचवेळी योग्य आहे असे तुमचे मत आहे? आजपर्यंत पुरोगामी प्रतिमा मिरवलेल्या छगन भुजबळ, अमोल मिटकरी व अजित पवार यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत व जिथे जातील तिथे यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत, असे हेरंब कुलकर्णी म्हणाले.
