सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्राचार्य अशोक गुंजाळ यांना संतप्त महिलांची बेदम मारहाण! निमगाव खुर्द येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात ढवळाढवळ केल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निमगाव खुर्द येथील तेवीस वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत मयत विवाहितेच्या माहेरच्या महिलांनी सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा खांडेश्वर मंदिराचे विश्वस्त अशोक आप्पासाहेब गुंजाळ यांना बेदम मारहाण करीत आपला रोष व्यक्त केला. यावेळी त्यांना सोडविण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीलाही संतप्त महिलांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी निमगाव खुर्दमध्ये घडली. या प्रकरणी गुंजाळ यांनी तालुका पोलीस ठाणे गाठले असून तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 10 ऑक्टोबररोजी तालुक्यातील निमगाव खुर्द येथील पूनम अमोल कासार या तवीस वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर निमगाव खुर्द व चिखली या दोन्ही गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी संयम दाखवल्याने त्यावेळी कोणताही अनर्थ घडला नाही. पण आपल्या मुलीचा नाहक बळी गेल्याची सल त्यांच्या मनात कायम असल्याने त्याचा उद्रेक होणार हे निश्चित होते.

सदरच्या विवाहितेच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ सौरभ विलास हासे याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी मयत विवाहितेचा पती अमोल, सासरा आबासाहेब व सासू अलका कासार यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 498 (अ), 304 (ब), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. मयतेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सदरचा विवाह पार पडला होता. विवाहानंतर मयतेच्या सासरच्या मंडळींनी ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून चार लाख रुपये आणावे यासाठी तगादा लावला होता, त्यावरुन तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरू होता. त्याला कंटाळून तिने 10 ऑक्टोबर रोजी घराच्या बाजूला असलेल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली.

या घटनेनंतर मयतेच्या माहेरील मंडळींनी संयम दाखवला खरा, मात्र तिच्या दहाव्याच्या कार्यक्रमात काहीतरी गोंधळ होणार असा काहीसा पूर्व अंदाज होता. त्याप्रमाणे आज सकाळी निमगाव खुर्दमध्ये घडलेही. सदरच्या घटनेनंतर मयत महिलेचे मामे सासरे असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्राचार्य व खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अशोक आप्पासाहेब गुंजाळ यांनी आपले पद व पैशांचा वापर करुन पोलिसांवर दबाव निर्माण केला, आरोग्य यंत्रणेवरही दबाव आणून शवविच्छेदन अहवालात अफरातफर केली असा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता, तेव्हाच दहाव्याच्या दिनी काहीतरी घडणार हे निश्चित झाले होते.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास निमगाव खुर्दमध्ये मयत पूनम कासार हिच्या दहाव्या दिवसाच्या विधीचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला निमगाव खुर्दसह चिखलीतूनही महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधीचा कार्यक्रम झाल्यानंतर इतर मंडळी आपापल्या घरी निघून गेली, मात्र अशोक गुंजाळ आपल्या अन्य नातेवाईकांसह तेथेच राहीले. या संधीचा फायदा घेत पूर्वतयारीतच आलेल्या मयतेच्या माहेरच्या महिलांनी त्यांना घेराव घालून लाथा-बुक्क्यांनी आणि चपलांनी मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून त्यांच्या पत्नीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी धाव घेतली, मात्र संतप्त महिलांनी त्यांनाही चांगलाच चोप दिला. आपल्या आई-वडिलांना होणारी मारहाण असह्य झालेल्या आणि सध्या पुण्यात राहणार्या त्यांच्या मुलीनेही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिलाही नाहक मार खावा लागला.

जवळपास अर्धातास यथेच्छ धुलाई झाल्यानंतर काहींनी मध्यस्थी करीत अशोक गुंजाळ यांना महिलांच्या गराड्यातून बाहेर काढून तेथून रवाना केले. त्यांनीही प्राथमिक उपचार घेवून थेट तालुका पोलीस ठाणे गाठले असून तक्रार देण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. अत्यंत सुस्वभावी असलेल्या पूनमचा गेल्यावर्षी डिसेंबरमध्येच विवाह झाला होता. सुखी संसाराची स्वनं सोबत घेवून सासर गाठणार्या या तरुणीच्या जीवनात जणू वैवाहिक सुखच नसल्यागत काही दिवसांतच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला आणि त्याची परिणीती अवघ्या नऊ महिन्यात तिचा जीव जाण्यात झाली.

तिच्या आत्महत्येच्या वार्तेने अवघ्या तालुक्यातून हळहळ व्यक्त केली गेली होती. या प्रकरणात सुरुवातीपासून हस्तक्षेप करीत अशोक गुंजाळ यांनी यंत्रणेसह सर्वांवरच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अगदी घटनेच्या दिवसापासूनच चिखलीतील हासे मंडळींचा त्यांच्यावर रोष होता. आजच्या मारहाणीतून तो समोर आला आहे. या प्रकरणाने तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
![]()
