संगमनेरच्या दसरा उत्सवात वाहतूक कोंडीचा त्रास! पोलिसांचे ढिसाळ नियोजन; वाहनांसह अनेकांच्या सहभागाने सामान्य वैतागले


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक दशकांपासून विजयादशमीच्या निमित्ताने निर्विघ्नपणे पार पडणार्‍या संगमनेरच्या सीमोल्लंघनात मंगळवारी सामान्य संगमनेरकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. गर्दीच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक उत्सवात सहभाग होताना शयतो बहुतेकजण वाहनांचा वापर टाळतात, यंदाच्या विजयादशमी उत्सवात मात्र सामाजिक विचारांची वाणवा दिसल्याने अनेकांनी पायी चालणारी लहान मुले, महिला व वृद्धांकडे दुर्लक्ष करीत दुचाकीसह सीमा ओलांडण्याचे प्रयोग केल्याने सामान्य नागरिकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला. त्यातच यावर्षी वाहतुकीच्या नियोजनातही पोलिसांचा ढिसाळपणाच दिसून आल्याने सायंकाळी प्रचंड गर्दीच्या वेळीही या रस्त्यावरुन दुचाकींसह सर्वप्रकारची वाहतूक सुरु होती.

संगमनेरच्या विजयादशमी उत्सवाला मोठी परंपरा आहे. पूर्वी अकोले नाका तालीम संघाकडून (माळीवाडा) दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी म्हाळुंगी नदीच्या पात्रात भल्या मोठ्या रावणाची प्रतिकृती तयार करुन त्याचे दहन केले जात असत. त्याचबरोबर येथील मालपाणी उद्योग समूहात असलेल्या शमीच्या वृक्षाचे पूजन करुन संगमनेरकर सीमोल्लंघन साजरा करीत घरी परतत. मात्र काही दशकांपूर्वी रावण दहनाची परंपरा खंडीत झाली. ती मालपाणी परिवाराने पुन्हा सुरु केल्याने दरवर्षी मालपाणी उद्योग समूहाच्या अकोले रस्त्यावरील कारखान्याच्या उत्तरेकडील बाजूस रावण दहनाचा कार्यक्रम होवू लागला. यावेळी संगमनेरकर मोठी गर्दी करीत असतात.

त्यासोबतच मालपाणी उद्योगाच्या कारखान्यात असलेल्या शमीच्या वृक्षाची पूजा करण्याचीही परंपरा असल्याने सीमोल्लंघनासाठी जाणारा प्रत्येक नागरिक याठिकाणी जातो. त्यासाठी यंदा मालपाणी उद्योग समूहाने परिसराची सजावट अतिशय आकर्षक पद्धतीने केली होती. वेगवेगळ्या देवी-देवतांच्या प्रतिमा, त्यांची आकर्षक सजावट, संपूर्ण परिसरात केलेली अतिशय देखणी विद्युत रोषणाई यामुळे हा परिसर खूप सुंदर दिसत होता. याच परिसरात ‘सेल्फी पॉईंट’ व श्रीराम-लक्ष्मण-जाणकी यांच्या आकर्षक प्रतिकृतीसमोर अनेकजण फोटो घेण्यात व्यस्त असल्याचेही यावेळी दिसत होते. एकीकडे खासगी कंपनीने आपली परंपरा अतिशय उत्तमपणे पूर्ण केल्याचे दिसत असताना दुसरीकडे हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याची ज्यांची थेट जबाबदारी होती, त्या पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही यावेळी स्पष्टपणे बघायला मिळाले.

खरेतर सायंकाळच्या सुमारास अकोले रस्त्यावरुन हजारो संगमनेरकर पायी जावून सीमोल्लंघन करण्याची परपंरा असताना दरवर्षी पोलिसांकडून जाजू पेट्रोल पंपाजवळ अडथळे लावून दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रतिबंध केला जातो. यावर्षी मात्र पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करतांना या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने अगदी जाजू पंपापासून ते मालपाणी कारखान्यापर्यंत पदोपदी दुचाकी व चारचाकी वाहनांची कोंडी व आणि त्यातून जीव मुठीत घेवून पायी चालणारे अबालवृद्ध असे विचित्र चित्र दिसत होते. इतया मोठ्या संख्येने माणसं रस्त्यावर असतानाही जाजू पंप ते मालपाणी करखाना या संपूर्ण परिसरात अवघे दोन गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) दृष्टीस पडले. यावरुन पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचेही दर्शन घडले. सुदैवाने या दरम्यान कोणताही अपघात घडला नाही, मात्र सतत होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे सामान्य पादचार्‍यांना मात्र मोठा मनःस्ताप सहन करावा लागला.


मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने सायंकाळी साडेसातच्या सुमारास रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेला यंदा संगमनेरकरांची अभूतपूर्व गर्दी होती. रावणाची भलीमोठी प्रतिकृती, त्याचे दहन झाल्यानंतर उडणारे आकर्षक फटाके आणि सोबतीला ‘जय श्रीराम’चा घोष यामुळे सायंकाळच्या वेळेस हा संपूर्ण दुमदुमून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *