कोठेवाडी बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराचा तुरुंगात मृत्यू! औरंगाबाद येथील हरसूल कारागृहात भोगत होता जन्मठेपेची शिक्षा

नायक वृत्तसेवा, नगर
जिल्ह्यातील 2001 मध्ये गाजलेल्या कोठेवाडी येथील महिलांवरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील कैदी हब्या पानमळ्या भोसले (वय 55) याचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील हरसूल कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सोमवारी (ता.17) सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील 13 आरोपींना मोकोका अंतर्गत जन्मठेप आणि प्रत्येकी दहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यातील माफीच्या साक्षीदाराचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे.

कोठेवाडी (ता. पाथर्डी) येथे 17 जानेवारी, 2001 रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता संपूर्ण वस्तीवर 10 ते 15 आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. तसेच 44 हजार 35 रुपयांचे दागिने लुटले होते. तेव्हा ही घटना राज्यात गाजली होती. अहमदनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली. अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली. त्यानंतर आरोपींनी अन्य ठिकाणीही असेच गुन्हे केल्याचं आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला.

यामध्ये सर्व 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी 2 वर्षे सक्तमजुरी, तर मोक्का कायद्याच्या कलम 3 (4) अन्वये सर्व आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने मोक्कांतर्गत झालेली शिक्षा रद्द ठरवली. आधीची शिक्षा भोगून झालेल्या आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे गावात पुन्हा दशहतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करून पुन्हा न्यायालयात धाव घेतली. आता त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
