अवघ्या दोन तासांत 13 लाखांचे दागिने लंपास! बसस्थानकावर चोरट्यांचे साम्राज्य; पोलिसांकडून केवळ गुन्ह्यांची नोंद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलिसांच्या निष्क्रियतेचा पुरेपूर फायदा घेत गेल्याकाही वर्षांपासून संगमनेर बसस्थानकात फोफावलेल्या चोरीच्या घटनांनी अक्षरशः कळस गाठला आहे. जवळजवळ रोजच घडणार्‍या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना सोमवारी त्यात आणखी दोन संतापजनक घटनांची भर पडली आहे. दुपारच्या सत्रात अवघ्या दोन तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल 17.25 तोळे वजनाचे आणि 13 लाख 28 हजार 250 रुपये आजचे बाजारमूल्य असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेवून पोबारा केला. या घटनेनंतर प्रचंड वर्दळीच्या या बसस्थानकातील महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून प्रत्येक महिला पोलिसांच्या नावाने बोटं मोडीत आहे. पोलीस मात्र केवळ गुन्ह्यांची नोंद करण्यातच धन्यता मानत असल्याने संगमनेरातून मोठा संताप व्यक्त होत आहे. एकीकडे राज्य सरकार लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या राजकीय यशाने सत्तेचे इमले रचित असताना दुसरीकडे संगमनेरात मात्र त्याच बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचे विरोधाभाशी चित्र सध्या बघायला मिळत आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता.16) घडलेल्या या दोन्ही घटनांमधील पहिला प्रकार दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. सायखेडा (जि.नाशिक) येथे राहणार्‍या लता शरद घुगे या नाशिककडे जाणार्‍या बसची प्रतिक्षा करीत फलाटाजवळ थांबलेल्या होत्या. संगमनेर बसस्थानकात पोलिसांच्या आशीर्वादाने वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटनांची माहिती असल्याने त्यांनी आपल्याकडील सगळे दागिने काढून जवळील पर्समध्ये ठेवले होते. मात्र अंतःर्यामी असल्यागत बसस्थानकावर बिनधास्त वावरणार्‍या चोरट्यांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ‘त्या’ महिलेवरच केंद्रीत केले.


काही वेळातच फलाटावर लागलेल्या नाशिक बसमध्ये चढत असताना नेहमीप्रमाणे गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पर्सवर डल्ला मारला आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच पर्समध्ये ठेवलेली 36 ग्रॅम वजनाची मोहनमाळ, 35 ग्रॅम वजनाचे गंठण, सहा ग्रॅम वजनाची कर्णफुले, साडेदहा ग्रॅम वजनाची ओमची पानं, छोट्या रिंगा व सोन्याचे मणी अशा एकूण 6 लाख 73 हजार 750 रुपये बाजारमूल्याच्या सुवर्ण अलंकारांसह चांदीच्या बांगड्या, पैंजण व वाळे आणि दोन हजार रुपयांची रोकड असा जवळपास सात लाख रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. सदरील महिला गर्दीतून वाट काढीत बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, मात्र तो पर्यंत चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकून तेथून पोबारा केला होता.


या घटनेनंतर बसस्थानकात मोठा गदारोळ झाल्याने किमान सोमवारी नंतरच्या वेळात असा प्रकार पुन्हा घडेल याचा कोणीही विचार केला नसेल. मात्र निष्क्रिय आणि धाक संपलेल्या पोलिसांकडून काहीही कारवाई होणार नाही याची जणू पूर्वकल्पना असल्यागत पहिल्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांतच पुन्हा तसाच धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी बसस्थानक आंदण मिळालेल्या चोरट्यांनी नाशिकऐवजी पुण्याच्या दिशेने बसेस सुटणार्‍या फलाटावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यांच्या जाळ्यात पुण्याला निघालेल्या शुभांगी रवींद्र कासार (रा.खराडी, पुणे) या फसल्या. त्यांनीही चोरट्यांच्या भीतीने आपल्या जवळील सर्व दागिने आणि रोख रक्कम आधीच काढून जवळच्या पर्समध्ये ठेवली होती.


या वेळीही बसमध्ये चढतानाच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पर्सवर डल्ला मारला आणि त्यात ठेवलेल्या तब्बल 75 ग्रॅम (साडेसात तोळे) वजनाच्या गंठणसह प्रत्येकी पाच ग्रॅमची सोन्याची नथ आणि मंगळसूत्र व सोबत तीन हजारांची रोकड असा एकूण 6 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. यावेळीही सदरील महिला बसमध्ये चढल्यानंतर आपल्या पर्समधून दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, मात्र यावेळीही चोरटे आपले काम करुन अदृष्य झाले होते. या दोन्ही घटनांची नोंद सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरीही यापूर्वी बसस्थानकात घडलेल्या एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याने या दोन्ही घटनांचा तपास लागण्याची शक्यता अतिशय धुसर आहे.


जिल्ह्यातील सर्वाधीक प्रशस्त आणि देखणी इमारत म्हणून संगमनेर बसस्थानकाचा लौकीक आहे. या बसस्थानकात दररोज साडेतिनशेहून अधिक बसेसची वर्दळ असते व त्यातून दहा हजारांहून अधिक नागरिक रोज प्रवास करतात. त्यातच राज्य सरकारने महिलांना प्रवासात निम्म्या तिकिटाची सवलत दिली असल्याने प्रवाशांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. मात्र असे असतानाही संगमनेर बसस्थानकात कधीही पोलीस कर्मचारी तैनात नसतात. त्यातून दररोज चोरीच्या आणि दागिने लांबविण्याच्या घटना घडत असून पोलीस केवळ गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण करीत असल्याने शहर पोलिसांचे चोरट्यांशी साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप प्रवाशांमधून केला जात आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 152878

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *