महिलेची रस्त्यावर प्रसूती; दोषींवर कठोर कारवाई करा ः कानडे आमदार लहू कानडेंसह माजी खासदार प्रसाद तनपुरेंनी घेतली झाडाझडती

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून न घेतल्याने महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याची कालची घटना लज्जास्पद, कलंक लावणारी, शासनाची बेअब्रू करणारी आहे. आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवा. घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा. अन्यथा या आरोग्य केंद्राला मी स्वतः टाळे ठोकील असे आमदार लहू कानडे यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भागवत डोईफोडे यांना बजावले. शुक्रवारी (ता.14) देवळाली प्रवरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समवेत आमदार लहू कानडे यांनी भेट देऊन झाडाझडती घेतली.

गुरुवारी पहाटे सहा वाजता सुमन अरुण शिंदे (वय 30, रा. देवळाली प्रवरा) प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांना परिचारिकेने तपासून, दिवस भरले नाहीत व रक्ताची कमतरता आहे असे सांगून दाखल करून घेण्यास नकार घंटा वाजविली. कडाक्याच्या थंडीत जड पावलांनी प्रसूती कळा घेऊन सुमन शिंदे बाहेर पडल्या. दवाखान्यापासून तीनशे फूटावर गेल्यावर त्यांना पुन्हा प्रसूती कळा आल्या. रस्त्याच्या बाजूला परिसरातील महिलांनी साड्यांचा आडोसा करून प्रसूती केली. या महिलेची माजी खासदार तनपुरे व आमदार कानडे यांनी चौकशी केली. आमच्या आरोग्य कर्मचार्‍यांची चूकच नाही. असे काल ठासून सांगणार्‍या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड यांनी शुक्रवारी तनपुरे व कानडे यांच्या समक्ष ‘प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून, निगराणीखाली ठेवणे गरजेचे होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून, निर्णय घेणे गरजेचे होते. याप्रकरणी चूक झाली’ अशी कबुली दिली. त्यामुळे घटनेतील दोषींना पाठीशी घालत असल्याचे निष्पन्न झाले.

रस्त्याच्या बाजूला साड्यांच्या आडोशात दगडांवर प्रसूती करुन, आडलेल्या महिलेची सुखरूप सुटका केली. गोरगरीब रुग्णांना या आरोग्य केंद्रात चांगली वागणूक मिळत नाही अशी कैफियत पीडित महिलेची प्रसूती करणार्‍या परिसरातील महिला आशा माळी, कुसूम भिंगारदिवे, मथुरा सूर्यवंशी, परीगा सोनवणे यांनी आमदार कानडे व माजी खासदार तनपुरे यांच्यासमोर मांडली. त्यांचा जबाब घेऊन दोषींवर कारवाई करा अशा सूचना आमदार कानडे यांनी डॉ. डोईफोडे यांना दिल्या. याचबरोबर या आरोग्य केंद्रात रात्री उपचार मिळत नाहीत. सायंकाळी पाच नंतर आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार बंद केले जाते. वैद्यकीय अधिकारी डॉ. मासाळ खासगी दवाखाना चालवितात. रुग्णांना औषधे मिळत नाहीत. नेहमी बाहेरून औषधे घेण्यास सांगितले जाते, असा तक्रारींचा पाऊस जॉन संसारे व इतर नागरिकांनी पाडला. यावेळी रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, अण्णासाहेब चोथे, अशोक खुरुद, आप्पासाहेब ढूस, अरुण ढूस, केदारनाथ चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भागवत डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, देवळाली प्रवराचे वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ आदिंसह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते.

Visits: 8 Today: 1 Total: 115030

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *