शेतकरी खून प्रकरणी दोघा सख्ख्या भावांना जन्मठेप भातकुडगाव येथील घटना; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

नायक वृत्तसेवा, शेवगाव
शेतीच्या पाटपाण्याच्या वादातून ज्ञानेश्वर नागरगोजे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) या शेतकर्‍याचा खून करणार्‍या चित्तरंजन रामचंद्र घुमरे (वय 31) व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (वय 35, दोघे रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) या दोघा सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ठोठावली आहे.

ज्ञानेश्वर नागरगोजे हे भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे आई-वडिलांसोबत राहून शेती करत होते. त्यांच्या मामाचा मुलगा वैभव हरिभाऊ सानप (रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड) हा भातकुडगाव येथे शेती कामाच्या मदतीसाठी आला होता. 5 मार्च, 2020 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर व वैभव हे पिकाला पाणी देण्याठी शेतात गेले होते. ज्ञानेश्वर यांनी शेजारील चित्तरंजन व प्रियरंजन घुमरे यांच्या शेतजवळील पाटपाण्याच्या चारीच्या पत्र्याचे गेट उघडल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास सामनगाव चौफुलीवर मुळा चारीच्या पाटावर आले. त्याठिकाणी चित्तरंजन व प्रियरंजन हे दुचाकीवरून आले. आमच्या शेताजवळील चारीच्या पत्र्याचे गेट का काढले? असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. ज्ञानश्वर या मारहाणीत सुमारे 10 फूट उंचीवरून खाली डोक्यावर पडला. त्याच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घुमरे बंधू तेथून पळून गेले. वैभवने परिसरातील शेतकर्‍यांच्या मदतीने ज्ञानेश्वरला उपचारासाठी शेवगाव येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.

त्यानंतर वैभव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांत आरोपी घुमरे बंधूंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. घुमरे बंधूंविरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारच्यावतीने काम पाहिले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी, विजय गावडे, ए. टी. बटुळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहाय्य केले.

घुमरे बंधूंच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले शेतकरी ज्ञानेश्वर नागरगोजे यांच्यावर प्रारंभी शेवगाव येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या उपचारादरम्यान त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांचा 11 डिसेंबर, 2020 रोजी मृत्यू झाला.

Visits: 122 Today: 1 Total: 1116046

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *