कळसूबाई मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आजीचे उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

नायक वृत्तसेवा, अकोले
कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जिर्णोद्धार करावा, तेथे येणार्‍या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे. या मागण्यांसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या 91 वर्षाच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून (ता.14) बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषण मागे घ्यावे यासाठी वन खात्याच्या अधिकार्‍यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. देवीने आदेश दिल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नाही असे सांगत या वृद्धेने उपोषण सोडण्यास ठाम नकार दर्शविला आहे.

1646 मीटर उंची असलेले कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर कळसूबाई देवीचे छोटेसे पुरातन मंदिर आहे. कळसूबाई ही परिसरातील अनेकांचे कुलदैवत आहे. वर्षभर शिखरावर भाविकांचा राबता सुरू असतो. नवरात्रात दहा दिवस भाविकांची रीघ लागते. राज्यभरातून अनेक गिर्यारोहक या शिखराला भेट देत असतात. शिखरावर असणारे हे मंदिर अतिशय छोटे असून एकावेळी तीन चार व्यक्ती मंदिरात जाऊ शकतात. तसेच शिखरावर येणार्‍या भविकांसाठी अन्य कोणताही निवारा उपलब्ध नाही. बर्‍याच वेळेला भाविक, गिर्यारोहक मंदिरातच निवार्‍यासाठी आश्रय घेतात. त्यामुळे मंदिरात योग्य ते पावित्र्य राखले जाऊ शकत नाही.

या जीर्ण झालेल्या मंदिराचा जिर्णोद्धार करावा, शिखरावर भाविकांसाठी निवार्‍याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी हौसाबाई नाईकवाडी यांची मागणी आहे. आपल्या मागणीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हौसाबाई या दत्तभक्त असून तालुक्यातील पाडाळणे येथील दत्त मंदिरात त्यांचे वास्तव्य असते. त्यांचा भक्त परिवारही मोठा असून राज्यभरातून अनेकजण या दत्त मंदिरात भेट देण्यासाठी येत असतात. त्यांचे अनेक भक्तमंडळीही यावेळी उपोषणस्थळी होती. तसेच अकोले तालुक वारकरी संघटनेनेही त्यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.

अकोले वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम व राजूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी सायंकाळी उपोषणस्थळी हौसाबाई नाईकवाडी यांची भेट घेतली. वनखाते त्यांच्या मागणीबाबत सकारात्मक असून कळसूबाई विकासाचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल, आपण उपोषण सोडावे ही विनंती त्यांनी हौसाबाई यांनी केली. मात्र त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडण्यास नकार दर्शविला. उपोषणस्थळी हौसाबाई नाईकवाडी यांचे अनेक भक्त, वारकरी उपस्थित असून ते भजन करीत आहेत.

कळसूबाई मंदिर परिसर वनक्षेत्रात असल्यामुळे तेथे बांधकाम करण्यास वनसंरक्षक कायद्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे समजते. तसेच कळसूबाईचे शिखर बारी गावाच्या हद्दीत असून बारी येथे अद्याप वनविकास समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळेही वनक्षेत्रात विकास योजना राबविण्यात अडचणी येत आहेत. 25 जानेवारी रोजी बारी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा यासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 115149

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *