मोटारसायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस; बारा गाड्या जप्त दोघांना अटक, दोघे फरार; पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोलेतून चोरी गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्यांचा तपास करताना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या तपास पथकाला चोरीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. यातील चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून जवळपास 5 लाखांच्या 12 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संगमनेर उपविभागातून मोटारसायकलची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या अधिनिस्त एक तपास पथक तयार करण्यात आले. या तपास पथकात पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, अमृत आढाव व गणेश शिंदे असे पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले. त्यांना संगमनेर उपविभागातील मोटारसायकल चोरी, घरफोडी, इतर चोरी व उघड नसलेले खुनाच्या गुन्ह्यांचा शोध लावण्याबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार अकोले पोलिसांत गुरनं.6/2022 भा. दं. वि. कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीने त्यांची बजाज कंपनीची लाल काळ्या रंगाची डिस्कव्हर (एमएच.17, एके.2884) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याची फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या तपासात असताना उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा प्रवीण एकनाथ गांडाळ (वय 21, रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर) याने केला आहे. त्याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेत विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार शरद रमेश गांडाळ (रा. सावरचोळ, मेंगाळवाडी, ता. संगमनेर) याच्या मदतीने मोटारसायकल विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यालाही ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्यांचे इतर दोन साथीदारही असल्याचे सांगितले. ते फरार असून अटक आरोपींकडून 12 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.

डिस्कव्हर एमएच.17, एके.2884, होंडा शाईन एमएच.13, सीडब्ल्यू.8005, होंडा शाईन एमएच.14,जीएल.9161, होंडा स्प्लेंडर टीएन.18, के.7103, होंडा स्प्लेंडर एमएच.14, एचएक्स.3848, स्प्लेंडर एमएच.15, एडब्ल्यू.6441, शाईन एमएच.14, ईई.8043, स्प्लेंडर एमएच.14, एचटी.2319, स्प्लेंडर यूपी.43, एबी.7130, बजाज सी.टी.100 गाड्या दोन आणि टी. व्ही. एस. स्टार सिटी क्रमांक खोडलेला अशी 12 बारा वाहने आहेत.
