मुख्य विसर्जन मिरवणुकीत हरपला हमरस्त्यावरील उत्साह! मानाच्या मंडळाची मनमानी; अवघी नऊ मंडळे लुटतात विसर्जन मार्गाचा आनंद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता पारंपरिक पद्धतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशीच होते. पूर्वी संगमनेरची मुख्य विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता सुरु व्हायची. त्यामुळे विसर्जनाचा संपूर्ण मार्ग अन्य मंडळांसाठी खुला राहात असल्याने शहराच्या हमरस्त्यावर दिवसभर विविध लहान-मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका आणि त्यातून वाहणारा अबालवृद्धांचा उत्साह बघायला मिळत. मात्र २३ वर्षांपूर्वीच्या एका घटनेने या परंपरेत बदल केला आणि अनेक दशके शहराच्या मुख्य रस्त्यावरुन वाहणारा गणेशोत्सवाचा अखंड उत्साहच हरपला. आजच्या स्थितीत जवळपास शंभरावर गणेश मंडळांच्या मिरवणुकांनी दिवसभर गजबजणारा मेनरोड आता केवळ काही मंडळांची मक्तेदारी बनला असून मानाच्या मंडळांच्या मनमानीमुळे असंख्य मंडळांना आपल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मुरड घालीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. मानाच्या मंडळांनी ‘माना’सोबत जोडून असलेल्या जबाबदारीचेही भान ठेवले तर, शहराच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला गतवैभव प्राप्त होवू शकते.

२२०० वर्षांचा इतिहास असलेले संगमनेर शहर प्रागैतिहासापासून विविध घटना, घडामोडी आणि चळवळींचे केंद्र म्हणून सतत आघाडीवर राहिले आहे. रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी दंडकारण्यातून केलेला प्रवास असो, अथवा महाभारतात जरासंधाची नगरी म्हणून उत्खणनातून समोर आलेली जोर्वे संस्कृती. इतिहासात शहाजीराजे भोसले यांचा सातत्याचा वावर असो, अथवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जालना लुटल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या काळात संगमनेरातून विश्रामगडाकडे केलेली घोडदौड. संगमनेर शहर यासारख्या असंख्य घटनांचा साक्षीदार असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. याशिवाय स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरु व स्वातंत्र्योत्तर काळात इंदिरा गांधी यासारख्या विभूतींनी संगमनेरला भेट देत आंदोलनांचे व चळवळींचे नेतृत्त्व केल्याचेही इतिहास सांगतो.

अशा संगमनेर शहरात पुण्याच्या पाठोपाठ १८९५ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे हा उत्सव शहरातील ज्या सोमेश्वर मंदिरातून सुरु झाला, त्या मंदिराचा इतिहासही मोठा रंजक आहे. मालपाणी परिवाराच्या खासगी मालकीच्या या मंदिराचे बांधकाम जयरामदास बुधमल मालपाणी यांनी १८८५ साली सुरु केले व ते १८९३ साली पूर्ण झाले. त्याच्या पुढच्या वर्षी १८९४ साली लोकमान्य टिळकांनी पुण्यातील विंचुरकरवाड्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यावर्षी पुण्यात शंभराहून अधिक ठिकाणी पार्थिव गणेशमूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. या उत्सवातून समाज प्रबोधन व्हावे व स्वातंत्र्यलढ्यास बळ मिळावे असा हेतू होता. त्यांचा हा विचार काही दिवसांतच संगमनेरातही रुजला आणि १८९५ साली मालपाणींच्या सोमेश्वर मंदिरात संगमनेरातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला.

त्यानंतरच्या कालावधीत मेनरोडवरील चौंडेश्वरी मंदिर, साळीवाड्यातील लक्ष्मीनारायण मंदिर, चावडीवरील बालाजी मंदिर, चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिर, कॅप्टन लक्ष्मी चौकातील जगदीश मंदिर, नेहरु चौकातील मारुती मंदिर आणि माळीवाड्यातील मारुती मंदिरातही टप्प्याटप्प्याने या उत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीला या उत्सवाच्या दहा दिवसात भजन-कीर्तनासह जनप्रबोधनाचे कार्य साधले जायचे. सोमेश्वर मंदिरात तर दरवर्षी पेटीट विद्यालयाचे विद्यार्थी विविध धार्मिक, पौराणिक कथानकांचा समावेश असलेल्या वेगवेगळ्या नाटीका सादर करुन संगमनेरकरांचे मनोरंजन करीत असे इतिहासाचे अभ्यासक डॉ. संतोष खेडलेकर सांगतात. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात या उत्सवाचा हेतू आणि स्वरुपामध्ये अमुलाग्र बदल होत गेले.

स्वातंत्र्यौत्तर काळात शहरातील सार्वजनिक गणेशे मंडळांच्या विसर्जन मिरवणुका काढल्या जावू लागल्या. शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा शुभारंभ करणारा सोमेश्वर मंदिरातील मानाचा गणपती रंगारगल्लीतील मांडवात स्थापन होवू लागल्याने मुख्य विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी राहण्याचा पहिला मान सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाला मिळाला. त्या पाठोपाठ क्रमानुसार ज्या-ज्या ठिकाणी पूर्वीपासून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते त्या मंडळांचा समावेश झाला. मात्र ही मिरवणूक दरवर्षी दुपारी चार वाजता सुरु होत असत. मिरवणुकीचा मार्ग मानाच्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळापासून सुरु होवून तो नगरपालिकेपर्यंत गृहीत धरला जातो. परंतु मुख्य मिरवणुकच सायंकाळी ४ वाजता सुरु होत असल्याने सकाळपासून दुपारी चारपर्यंत हा संपूर्ण मार्ग अन्य सार्वजनिक व खासगी मंडळांच्या गणपतीसाठी खुला ठेवला जात असत.

त्यामुळे दुपारी चार वाजता प्रत्यक्ष मुख्य विसर्जन मिरवणूक सुरु होण्यापूर्वी गवंडीपुरा ते नगरपालिका या शहराच्या हमरस्त्यावर शहर व उपनगरांसह आसपासच्या ग्रामीणभागातील असंख्य मंडळे वाजत गाजत मिरवणुकीने आपल्या गणरायाला विसर्जनासाठी नेत होते. त्यावेळी या मिरवणुकांमध्ये अगदी संगमनेर बस आगार, विद्युत मंडळ, संगमनेर नगर परिषद या निमशासकीय कार्यालयांमधील गणपतींचाही समावेश असायचा. त्यातून संगमनेरचा मेनरोड दिवसभर विविध छोटी-मोठी मंडळे व आस्थापनांच्या गणपतींनी आणि त्या पुढ्यात आनंदाने नाचणार्‍या कार्यकर्त्यांनी अक्षरशः ओसंडून वाहत होता. दुपारी चार वाजाता मुख्य मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी हा मार्ग मोकळा केला जात, त्यानंतर मानाच्या गणपती मंडळांचा समावेश असलेली मुख्य मिरवणूक सुरु व्हायची. ही परंपरा २००० सालापर्यंत कायम होती.

मात्र त्याचवर्षी मुख्य मिरवणुकीतील मानाचा पहिला गणपती असलेल्या सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाची मिरवणूक सुरु झाल्यानंतर त्याच्या पुढ्यात काही मंडळांचे गणपती असल्याचे समोर आल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले व त्यांनी रंगारगल्लीतून गणपती पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली. तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद पवार यांनी महत्प्रयास करुनही त्यांना पुढील तासभर विसर्जन मार्गावरील अन्य गणेश मंडळे पुढे रेटता न आल्याने मोठा बाका प्रसंग उभा राहिला. रंगारगल्लीत तर तणावासारखी स्थिती निर्माण झाल्याने त्यावेळी अन्य मार्गाने विसर्जनासाठी निघालेल्या मंडळांना रंगारगल्लीचा मार्ग बदलावा लागला. जशी रात्र सरत होती, तसा शहरातील तणावही वाढत होता. मानाच्या गणपतीचा मानभंग झाल्याने गावातील अन्य कार्यकर्तेही रंगारगल्लीत गर्दी करु लागले, त्यामुळे शहरातील परिस्थिती स्फोटक बनली होती.

अखेर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पोलीस प्रमुखांनी संगमनेरात येवून मानाच्या गणरायाची माफी मागितली व यापुढे पुन्हा असा प्रसंग उद्भवणार नाही यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्याचे आश्वासन देत गणरायाचे विसर्जन करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार रंगारगल्लीतील काही ज्येष्ठांनी पुढाकार घेत जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर्षी मानाच्या गणपतीची मिरवणूक न काढता जागेवरुनच बाप्पांना विसर्जनासाठी नेण्यात आले. त्याच्या पुढील वर्षी प्रशासनाच्या सूचनेवरुन संगमनेरची मुख्य विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता काढण्यास सुरुवात झाली. आणि येथूनच अनेक दशके विसर्जनाच्या दिनी दिवस-रात्र गर्दीने फुलणार्‍या शहराच्या मुख्यरस्त्याला अवकळा येवून या रस्त्यावरील तरुणाईच्या उत्साहाला ओहोटी लागली.

मागील २३ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासन मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर अन्य कोणत्याही गणेश मंडळाला येवू देत नाहीत. त्याचा परिणाम सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या मार्गावरुन जाणार्‍या असंख्य छोट्या-मोठ्या मंडळांना शहरातील अन्य मार्गांचा वापर करावा लागतो. त्यातच पूर्वी मुख्य मिरवणुकीत सहभागी होणारी अनेक मंडळे काही मंडळाच्या मिरवणुका दीर्घकाळ रेंगाळत असल्याने त्यातून माघारी फिरले व त्यांनी दुसर्‍या मार्गाचा वापर करुन आपल्या मंडळाचा गणपती विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला. आजच्या स्थितीत रंगारगल्ली ते महात्मा फुले चौक या गजबजलेल्या विसर्जन मार्गाचा वापर केवळ मानाच्या नऊ गणपतींसाठीच होतोय.

वास्तविक मुख्य विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर रंगारगल्ली, चौंडेश्वरी, साळीवाडा, राजस्थान, चंद्रशेखर, नेहरु चौक, माळीवाडा, नवघरगल्ली व स्वामी विवेकानंद या मानाच्या केवळ नऊ मंडळांसह अन्य आठ ते दहा मंडळेच सहभागी होतात. मानाचा पहिला गणपती दुपारी दोन वाजता गवंडीपूर्‍यात येतो व येथून नगरपालिकेपर्यंतचे अंतर कापण्यासाठी त्याला तब्बल साडेपाच तासांचा कालावधी लागतो. त्यातच २००५ सालापासून देशात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाल्याने रात्री १२ वाजता मिरवणुकीतील सर्व प्रकारची वाद्ये पूर्णतः बंद केली जातात. त्यामुळे मानाच्या पहिल्या गणपतीला होणारा विलंब अन्य मंडळांच्या विलंबालाही कारणीभूत ठरुन दरवर्षी मुख्य मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांची संख्या मर्यादित असतानाही निम्म्याहून अधिक गणेश मंडळांना श्रीकृष्ण मंदिरापासूनच मूकपणे मिरवणुका पुढे काढाव्या लागतात.

विसर्जन मिरवणुकांसाठी मंडळे प्रचंड खर्च करीत असतात. त्यासाठी हजारो, लाखो रुपये खर्च करुन राज्यातील नावाजलेले ढोल-ताशा, बँड पथके मागविली जातात. मात्र अनेक मंडळांना मानाच्या मंडळांच्या मनमानीमुळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होवून आपल्या मिरवणुका मुख्य रस्त्याने काढता येत नाहीत, जे सहभागी होतात त्यांना मेनरोडवर येईपर्यंतच वाद्य वाजवण्याच्या नियमांचा सामना करावा लागतो. त्यातून शहराच्या या ऐतिहासिक सार्वजनिक उत्सवातील गणेश मंडळांची नाराजी वाढली असून यातून काहीतरी मार्ग काढण्याची आणि मानाच्या गणेश मंडळांनी शहरातील अन्य मंडळांचा विचार करण्याची मागणी समोर येवू लागली आहे. त्यातूनच पूर्वीप्रमाणे केवळ मानाच्या गणेश मंडळांचा सहभाग असलेली मुख्य मिरवणूक दुपारी चार वाजताच काढण्याची व तोपर्यंत गवंडीपुरा ते नगरपालिकेचा मार्ग खुला करण्याची मागणी समोर येवू लागली आहे.

संगमनेरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठा इतिहास आहे. या उत्सवातून सामाजिक एकोपा वाढावा असा लोकमान्य टिळकांचा हेतू होता. स्वातंत्र्य पूर्वकाळात त्यांचा हेतू सफलही झाला, मात्र त्याच उत्सवातून स्वातंत्र्यानंतरच्या काळात आता मनभेद होवू लागले आहेत. मानाच्या गणेश मंडळांनी केवळ स्थापनेच्या वर्षाच्या जोरावर विसर्जन मार्गावर हक्क सांगण्यापेक्षा शहरातील सगळ्या मंडळांना सोबत घेवून, सर्वांच्याच उत्साहाचा विचार करुन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण केवळ परंपरेने मिळालेला मान कधीही सन्मान मिळवून देत नसतो, मात्र जेव्हा मनातून सन्मान होतो तेव्हा त्याला परंपरेचीही गरज नसते याचे भान संगमनेरातील मानाच्या सर्व गणपती मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी ठेवण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *