कोल्हापूरचा माऊली जमदाडे ठरला साईकेसरीचा मानकरी श्रीराम नवमी यात्रेनिमित्त देशभरातील पैलवानांची शिर्डीत हजेरी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डीत यंदाच्या श्री रामनवमी उत्सवानिमित्ताने सोमवारी (ता.11) सायंकाळी कुस्त्यांच्या दंगलीत श्री साईकेसरी मानाच्या कुस्तीत दिल्ली येथील पैलपवान संजय दहिया व कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे यांच्यामध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने बाजी मारत साईकेसरीचा मान पटकावला. त्यास 71 हजार रुपयांच्या बक्षीसाबरोबरच साईकेसरी पट्टा आणि मानाची चांदीची गदा श्रीराम नवमी यात्रा समितीच्यावतीने देण्यात आली.

यंदा श्री रामनवमी उत्सवानिमित्त 11 एप्रिल रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यावेळी ग्रामदैवत मारुती मंदिरापासून नामवंत पहिलवानांना फेटे बांधून गावातून मिरवणूक काढून कुस्ती आखाड्यात आणण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, अ‍ॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, शिवाजी गोंदकर, यात्रा समितीचे अध्यक्ष कमलाकर कोते, सुधाकर शिंदे, बाबासाहेब कोते, दादासाहेब गोंदकर, नितीन कोते, नीलेश कोते, जगन्नाथ गोंदकर, रवींद्र कोते, संदीप पारख, सचिन तांबे, नितीन शेळके, अजय नागरे, राजेंद्र कोते, कुस्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर, उपाध्यक्ष अरविंद कोते, ताराचंद कोते, दत्ता कोते, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे, अविनाश गोंदकर, गणेश कोते, विशाल भडांगे, राकेश कोते, नामवंत भूमिपुत्र पहिलवान रवींद्र वाघ, राहाता तालुका तालीम संघाचे अध्यक्ष शिवाजीराजे चौधरी, विकास गोंदकर, किरण कोते, वीरेश चौधरी, महेश गोंदकर, तान्हाजी गोंदकर, विजय कोते, छत्रपती शासन व शिर्डी युवा ग्रामस्थ संघटनेचे मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी पहिले बक्षीस 71 हजार रुपयांचे ठेवण्यात आले होते. तर 51 हजार रुपयांची कुस्ती अनुपकुमार आणि नगरचा योगेश पवार यांच्यात झाली असून योगेश पवारने बाजी मारली. तर 71 हजार रुपयांची पहिली कुस्ती कोल्हापूरचा माऊली जमदाडे व दिल्लीचा संजय दहिया यांच्यात झाली असून माऊली जमदाडेने बाजी मारली. त्याचप्रमाणे तिसरे 41 हजार, 15 हजार रुपयांच्या दोन आणी विशेष म्हणजे महिलांंसाठी 11 हजार रुपयांच्या तीन कुस्त्या ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या चार कुस्त्या विजेत्या पहिलवानांना साईकेसरी पट्टा आणी चांदीची गदा देण्यात आली.

या स्पर्धेसाठी देशातील उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली येथील हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावलेले नामवंत पहिलवान हजेरी यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यामुळे यंदाचा कुस्ती हगामा ऐतिहासिक ठरला. या कुस्ती आखाड्यात ढाक, सवरी, एकलंगी, भांगडी, अरण, फासा, डूब, धोबीपछाड, एकेरी पट, दुहेरी पट असे डाव पाहायला मिळाले. महिलांची मानाची 11 हजार रुपयांची कुस्ती लावण्यात आली. यामध्ये तेजल सोनवणे व सासवडची यशस्वी खेडकर यांच्यामध्ये तेजल सोनवणे हिने बाजी मारली असून तिला मानाची चांदीची गदा व साईकेसरी पट्टा देऊन गौरविण्यात आले. तर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महिलांची पाच हजार रुपयांची कुस्ती लावण्यात आली. त्या अहमदनगरची लावण्या गोडसे हिने गायत्री खामकर हिच्यावर मात करत कुस्ती जिंकली.

Visits: 30 Today: 1 Total: 118084

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *