हाथरस घटनेच्या निषेधार्थ खडकाफाटा येथे जोशाबा सेवा संघाच्यावतीने रास्ता रोको

हाथरस घटनेच्या निषेधार्थ खडकाफाटा येथे जोशाबा सेवा संघाच्यावतीने रास्ता रोको
तरुणीवर अत्याचार करून खून करणार्‍या ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा ः सरोदे
नायक वृत्तसेवा, नेवासा
हाथरस घटनेच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावर खडकाफाटा येथे जोशाबा सेवा संघाच्यावतीने आज (गुरुवार ता.15) सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हाथरस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करा आणि अत्याचार करणार्‍या ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा अशी मुख्य मागणी जोशाबा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष देवराम सरोदे यांनी यावेळी बोलताना केली.


खडकाफाटा येथे सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या रास्ता रोको प्रसंगी बोलताना बहुजन समाजाचे नेते सुनील वाघमारे म्हणाले, हाथरसमधील घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. तेथील प्रशासकीय यंत्रणेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. याचा तीव्र निषेध व्यक्त करत या घटनेतील आरोपींना कडक शासन करा अशी मागणी त्यांनी केली.
जोशाबा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सरोदे म्हणाले, हाथरस जिल्ह्यातील बुलगडीगाव येथील तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा करावी. तसेच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देखील बडतर्फ करावे अशी मागणी केली. तर या प्रकरणी खोटा अहवाल देणार्‍या डॉक्टरांना बडतर्फ करून सह आरोपी करावे अशी देखील मागणी केली आहे.


यावेळी जोशाबा संघटनेचे प्रमुख देवराम सरोदे व सुनील वाघमारे यांच्या हस्ते तहसील कार्यालयाचे मंडलाधिकारी सुनील लवांडे व पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांना निवेदन देण्यात आले. इतरांची गैरसोय होऊ नये म्हणून सदरचा रास्ता रोको दहा मिनिटांनी थांबविला. यामध्ये जोशाबा सेवा संघाचे गोरख शेरे, ईश्वर शेरे, बाबासाहेब शेलार, नामदेव आवारे, राजेंद्र भूमकर, प्रल्हाद शेरे, दादाराम आघम, प्रकाश घुले, मोहन भुजंग, निवृत्ती आगळे, विठ्ठल आगळे, गोरक्ष शेरे, चंद्रकांत आगळे, रामेश्वर काळे, राम सरोदे, विकास काळे, रोहन भूमकर, महेश आगळे, शिवाजी शेरे, बाळासाहेब पवार, गोविंद सरोदे, आबासाहेब शिरसाठ, विजय शिरसाठ सहभागी होते. याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Visits: 164 Today: 1 Total: 1956785

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *