आरोप-प्रत्यारोपाने तापले पालिकेचे राजकारण! गरज पाहून तातडीची कामे; विरोधकांची मात्र स्टंटबाजी : दुर्गा तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वीच काम पूर्ण झालेले असतानाही नव्याने काढण्यात आलेल्या दोन निविदांचा मुद्दा उपस्थित करुन 34 लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणार्या भाजपाने गेल्या आठ दिवसांपासून आंदोलनाची राळ उठवली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली असून कोविडच्या कालावधीत संगमनेरकरांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेवून पारदर्शीपणेच कामे झाली आहेत. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचा झपाट्याने कायापायलट होत असून पालिकेकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने जनतेची दिशाभूल करण्यासाठीच विरोधकांनी ‘अमरधाम’चा विषय उपस्थित करुन स्टंटबाजी सुरु केल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

सन 2019 साली संगमनेर नगरपरिषदेने हिंदू धर्मियांच्या अमरधामसाठी 63 लाख 19 हजार 733 रुपयांची निविदा काढली होती. त्यातून अमरधामच्या वाढीव बांधकामासह सुशोभीकरणाचे कामही करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन वर्षांनी पालिकेच्या बांधकाम विभागाने एकाच दिवशी दोन स्वतंत्र निविदा सूचना प्रसिद्ध करुन त्याद्वारे ठेकेदारांकडून 33 लाख 99 हजार 969 रुपयांच्या कामांसाठी पुन्हा निविदा मागवल्या. हाच मुद्दा उचलून विरोधी गटातील भारतीय जनता पार्टीने संगमनेरच्या अमरधाम सुशोभीकरणाच्या कामात 34 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत गेल्या आठवड्यात त्या विरोधात आंदोलन पुकारले.

गेल्या आठवड्यात बुधवारी भाजपाने पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर साखळी उपोषण केले. या दरम्यान नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दोनवेळा आंदोलकांची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. समज-गैरसमज असतील तर संवादातून त्यावर तोडगा काढू असेही त्यांनी सांगितले. मात्र अमरधामध्ये जावून झालेल्या कामांचा पंचनामा करण्याच्या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने त्यातून मार्ग निघाला नाही. दुसर्या दिवशी आंदोलकांनी पालिकेचे गेटबंद करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने ऐनवेळी भाजपाने आपल्या आंदोलनाचे स्वरुप बदलले व थेट मुख्याधिकार्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या दिला.

या दरम्यान आंदोलक व मुख्याधिकारी यांच्यात बैठकांचे सत्रही सुरू होते. त्यातून सायंकाळी उशीराने मुख्याधिकार्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून चौकशीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी आंदोलन स्थगित करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ‘त्या’ आश्वासनानुसार कोणतीही कारवाई न झाल्याने शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही शनिवारी (ता.1) भाजपाने पवित्र निविदा प्रक्रीयेची अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला, मात्र कोविडचे कारण सांगत पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे ऐनवेळी आंदोलनाचे स्वरुप बदलून विरोधकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच शोकसभा आयोजित केली. या सभेत भाजपा पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त करतांना अमरधामच्या निविदेसह शहरात झालेल्या विविध कामांच्या निकृष्ट दर्जावर बोटं ठेवताना भ्रष्टाचारांचे आरोप केले व न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

या दरम्यानच्या काळात सत्ताधारी गटाकडून शहर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास मुर्तडक वगळता अन्य कोणीही प्रतिक्रीया दिल्या नाहीत. रविवारी (ता.2) विरोधकांचे आंदोलन आणि आरोप याबाबत खुद्द नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली. कोविडच्या संक्रमणाने अन्यत्र विकासाची गती खुंटलेली असताना संगमनेरात झपाट्याने सुरु असलेली विकासकामे आणि त्यातून पालिकेच्या पारदर्शी कामाबाबत वाढत असलेली जनतेतील लोकप्रियता पाहून विरोधक अस्वस्थ झाल्याची टीका त्यांनी केली. मागील तीन दशकांपासून नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचा कायापालट झाला असून एकामागून एक विकासकामांनी शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडल्याचे त्यांनी सांगितले.

2019 साली संगमनेरच्या अमरधाममधील सुशोभीकरणाचे काम झाले हे खरे आहे. मात्र त्यानंतर कोविड संक्रमण सुरू झाले. दुसर्या लाटेच्या कालावधीत संगमनेरच्या अमरधाममध्ये दररोज दहा ते बारा मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हायचे. त्यातून समोर आलेल्या गोष्टी, नागरिकांच्या सूचना, त्यांचा आग्रह आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार गरज आणि तातडी ओळखून मर्यादेच्या पलिकडे जावून काही कामे केली गेल्याचे त्या म्हणाल्या. मात्र विरोधकांनी त्याचे भांडवल करुन आंदोलनाची केवळ स्टंटबाजी सुरू केली असून त्यातून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे.

खरेतर कोविडचा भयानक काळ आपण सगळ्यांनी पाहिला व अनुभवला आहे. या कालावधीत संगमनेर कोविड उपचारांचे ‘हब’ बनले होते. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील नागरिकांनीही संगमनेरात उपचार घेतले. या कालावधीत संगमनेर नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्यांसाठी खूप मोठे काम केले आहे. दररोज जंतूनाशक फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्य सर्वेक्षण, पालिकेचे कोविड रुग्णालय, लसीकरणासाठी राबविलेली मोहीम, कोविडने मृत्यूमुखी पडलेल्यांचा मोफत अंत्यविधी अशा विविध कामांतून पालिकेने जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या कारभाराचे होत असलेले कौतुक विरोधकांना सहन होत नसल्याने चुकीचे मुद्दे उपस्थित करुन पालिकेच्या पारदर्शी कामकाजावर शिंतोडे उडविण्याचा केविलवाणा प्रयोग विरोधकांकडून सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

अमरधामच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी त्यावर खुलासा करावा अशी मागणी विरोधकांनी गेल्या बुधवारपासून लावून धरली होती. आता नगराध्यक्षा तांबे यांनी विरोधकांचे आरोप नैराश्यातून आणि पालिकेच्या कारभाराबाबत जनमानसात निर्माण झालेली चांगली प्रतिमा पाहून होत असल्याचा पलटवार करीत पालिकेचे कामकाज लोकहिताचे आधि पारदर्शी असल्याचे बजावल्याने विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया व आंदोलनाची दिशा काय असेल हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

