लॉकडाऊनमुळे श्रीरामपूर आगाराला मोठा आर्थिक फटका अवघ्या 20 ते 25 बसेसद्वारे 50 फेर्या; उत्पन्न केवळ सव्वा लाख
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीरामपूर आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या 25 बसेसच्या अहमदनगर, पुणे, कोल्हापूर व अकलूज येथे फेर्या सुरू आहेत. मात्र, तब्बल पाच हजार किलोमीटर प्रवास करूनही निम्मेच उत्पन्न हाती पडत आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन सुरू केला आहे. मात्र, एस. टी. महामंडळाला त्यातून सूट देण्यात आली आहे. श्रीरामपूर आगाराच्या राज्याबाहेरील सूरत, इंदोर तसेच मुंबई येथील बसफेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हा अंतर्गत बसेसही उत्पन्नाअभावी बंद आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ अहमदनगर, पुणे, कोल्हापूर व अकलूज येथील फेर्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
आगारातून या शहरांसाठी सध्या दररोज 20 ते 25 बसेस सुरू आहेत. मात्र, त्यांना प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवासी बसेसना मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना केवळ एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. कोरोना पूर्वकाळामध्ये या बसेस दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत जमा करत होत्या. तसेच आगाराने 48 पैकी 12 बसेस मालवाहतुकीसाठी सुरू केल्या आहेत. सोयाबीन, गहू, तसेच कांद्याची ते राज्यात वाहतूक करतात. व्यापार्यांची या बसेसना चांगली मागणी आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात येथील आगाराने मालवाहतुकीमधील उत्पन्नात पारनेर नंतर दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
कोरोना व लॉकडाऊन काळात आमच्या कर्मचार्यांनी चोखपणे सेवा बजावली आहे. मुंबईतील बेस्ट बसेसवर काम करण्यासाठी त्यांना प्रसंगी जावे लागते तरीही ती कार्यतत्पर आहेत.
– राकेश शिवदे (आगार प्रमुख-श्रीरामपूर)