पहिल्या दिवशी तालुक्यातील ‘चार’ टक्के विद्यार्थी ‘लसवंत’! तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण आवश्यक : तहसीलदार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशातील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी सोमवारपासून लसीकरण मोहीम सुरु झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 15 हजार 209 तर संगमनेर तालुक्यातील 1 हजार 491 जणांनी कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्र घेतली. तालुक्यातील धांदरफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सर्वाधिक 363 तर साकूर ग्रामीण रुग्णालयात सर्वात कमी अवघ्या सतरा जणांचे लसीकरण झाले. संगमनेर तालुक्यात या वयोगटातील एकूण 38 हजार लाभार्थी असून दहा ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण पंधरा ठिकाणी हि मोहीम राबविली जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील चार टक्के तर जिल्ह्यातील 6.4 टक्के मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांनी आधारकार्डसह आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

गेल्यावर्षी जानेवारीत भारतात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या धोरणानुसार सुरुवातीला कोविड विरोधात थेट लढणार्या आरोग्यसेवकांचे तर त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. 1 मे 2021 पासून
देशातील 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीला लसीकरणासाठी नागरिकांचा निरुत्साह अधिक दिसून. या दरम्यान एप्रिल व मे या दोन महिन्यात कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळली. या लाटेत लाखों नागरिकांना लागण होण्यासह देशभरातील लाखों नागरिकांचे बळी गेले, ऑक्सिजन शिवाय तडफडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटनाही समोर आल्याने या दोन महिन्याच्या काळात या महामारीचे सर्वात प्राणघातक रुप बघायला मिळाले. त्यामुळे सुरुवातीला लशीपासून दूर असणार्या नागरिकांच्या लसीकरण केंद्रांच्या बाहेर पहाटेपासूनच रांगा दिसू लागल्या.

व्यापक लसीकरणाच्या या आठ महिन्यात या मोहीमेने विविध चढ-उतार, आरोप-प्रत्यारोपांची नोंद घेत कॅलेंडर ओलांडतांना दिडशे कोटी डोसचा आकडा गाठला. त्यातच संक्रमण टिकून असतांनाच युरोपीय खंडातून ओमायक्रॉन नावाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट येवून आदळल्याने व त्यातच ठिकठिकाणच्या राज्य सरकारांनी दिवाळीनंतर आपापल्या राज्यातील शाळा-महाविद्यालये व धार्मिक स्थळांचे ताळे उघडल्याने कोरोनाच्या तिसर्या लाटेचे संकट घोंगावू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याचे नुकसान होवू नये यासाठी केंद्र सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणाची घोषणा करण्यात आली.

1 जानेवारीपासून कोविन या संकेतस्थळावर 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली. याशिवाय लसीकरण केंद्रात थेट जावूनही नोंदणी करुन लस घेण्याची सवलत देण्यात आली. या मोहीमेला सोमवारी (ता.3) सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात या वयोगटातील एकूण 2 लाख 38 हजार 943 लाभार्थी असून संगमनेर तालुक्यातील लाभार्भ्यांची संख्या 37 हजार 899 इतकी आहे. सोमवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एकूण 15 हजार 209 जणांना तर संगमनेर तालुक्यातील 1 हजार 491 (3.93 टक्के) जणांना कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस देण्यात आला.

संगमनेर तालुक्यातील शहर हद्दिसह घुलेवाडी व साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 529 लाभार्थी असून सोमवारी त्यातील अवघ्या 281 (1.91 टक्के) जणांनी लस घेतली. त्यात ओहरा महाविद्यालयातील 224, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात 40 तर साकूर ग्रामीण रुग्णालयातील 17 जणांचा समावेश आहे. याशिवाय आश्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात 2 हजार 295 लाभार्थी असून 72 जणांचे लसीकरण झाले आहे. बोटा परिसरातील 1 हजार 805 लाभार्थ्यांपैकी 60, चंदनापूरी परिसरातील 3 हजार 575 लाभार्थ्यांपैकी शून्य, धांदरफळ परिसरातील 2 हजार 267 लाभार्थ्यांपैकी 363,

घारगाव परिसरातील 1 हजार 180 लाभार्थ्यांपैकी 94, जवळे बाळेश्वर परिसरातील 1 हजार 329 लाभार्थ्यांपैकी शून्य, जवळे कडलग परिसरातील 1 हजार 947 लाभार्थ्यांपैकी 353, निमगाव जाळी परिसरातील 2 हजार 904 लाभार्थ्यांपैकी 20, निमोण परिसरातील 2 हजार 488 लाभार्थ्यांपैकी 213 व तळेगाव परिसरातील 2 हजार 580 लाभार्थ्यांपैकी 35 अशा शहरी व ग्रामीण भागातील मिळून एकूण 37 हजार 899 लाभार्थ्यांपैकी 1 हजार 491 जणांनी सोमवारी कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस टोचून घेतला.

शासनाने 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरु केली आहे. आपल्या सुरक्षिततेसाठी लसीकरण आवश्यक आहे. घुलेवाडी व साकूर येथील ग्रामीण रुग्णालयांसह तालुक्यातील दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना कोविन अॅप्लिकेशनवर अथवा प्रत्यक्ष लसीकरण केंंद्रावर जावूनही नोंदणी करता येईल. लस घेतल्याने प्राणांतिक संकट टळते, त्यामुळे वरील वयोगटातील लाभार्थ्यांसह ज्या नागरिकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही त्यांनी लवकरात लवकर ते करुन घ्यावे.
अमोल निकम
तहसिलदार : संगमनेर

