विद्यार्थीनीची छेड काढणार्‍या गुंडांचा दोघांवर चाकू हल्ला! एकजण गंभीर जखमी; ओहरा महाविद्यालयाजवळील संतापजनक घटना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविद्यालयातून घराकडे निघालेल्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवून तिची छेड काढण्याचा व तिच्या मदतीसाठी धावलेल्या दोघांवर थेट प्राणघातक हल्ला करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्या विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी सात जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आली आहे. या संतापजनक घटनेनंतर विद्यार्थीनींची सुरक्षा चर्चेत आली असून शाळा व महाविद्यालये सुरु झाल्याने रोडरोमिओ व अशा प्रकारच्या विकृत घटनाही घडू लागल्या आहेत. पोलिसांनी या प्रकाराची गांभिर्याने दखल घेवून अशा सर्व ठिकाणांवर गस्त वाढवून विनाकारण वावर असलेल्यांना हिसका दाखवण्याची गरज आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी (ता.11) सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरालगतच्या प्रवरा परिसरातील ओहरा महाविद्यालयाजवळ घडला. कासारवाडीत राहणारी एक विद्यार्थीनी महाविद्यालयातून आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाली. त्याचवेळी साई मंदिराच्या दिशेने पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अनिकेत दळे, अनिकेत मंडलिक व एका अल्पवयीन मुलासह अन्य चार जणांनी त्या विद्यार्थीनीची छेड काढण्यास सुरुवात केली.

महाविद्यालयाच्या अगदी प्रवेशद्वारासमोर घडलेल्या या संतापजनक घटनेत पाठीमागून आलेल्या अनिकेत दळे या विकृताने त्या विद्यार्थीनीला ‘तू कोठे चालली आहेस’ अशी विचारणा करीत ‘माझ्या गाडीवर बस’ असे म्हणत चक्क तिच्या डोक्यावर टपली मारली. त्याच्या सोबत असणारा दुसरा विकृत अनिकेत मंडलिक त्याच्याही पुढे निघाला. त्याने ‘तू खूप सुंदर दिसतेस, मला फार आवडतेस’ असे म्हणत तिचे केस ओढण्यापर्यंत व त्यानंतर लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करण्यापर्यंत त्याची मजल गेली. त्या अल्पवयीन मुलासह बाकी चौघे यावेळी शिट्ट्या वाजवून त्या एकट्या विद्यार्थीनीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हा सगळा गदारोळ पाहून याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा त्या विद्यार्थीनीचा चुतल भाऊ आणि त्याचा मित्र आपल्या बहिणीच्या मदतीला धावला. यावेळी त्याने त्या विकृत गुंडांना ‘तुम्ही माझ्या बहिणीला का छेडता?’ असा सवाल काय केला, तर आपल्याच बापाची सल्तनत असल्यागत तेथे बिनधास्त वावरणार्‍या या गुडांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अनिकेत दळेने त्या विद्यार्थीनीच्या चुलत भावाची कॉलर पकडून खिशातला चाकू काढला आणि त्याच्या गळ्यात खुपसण्यासाठी त्याच्यावर वार केला, मात्र ऐनवेळी तो मागे सरकल्याने त्याचा निशाणा हुकला मात्र घसरता वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

या दरम्यान दळेच्या सोबत असलेल्या इतर सर्व आरोपींनी त्या दोघांनाही लाथाबुक्क्यांखाली बेदम मारहाण केली. यावेळी आसपास विद्यार्थ्यांची गर्दी होवू लागल्याने दळे धाडसाने पुढे होत ‘आमच्या नादी लागायचे नाही, अ‍ॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करुन..’ असा सज्जड दम भरु लागला. यानंतर हुल्लडबाजी करीत हे सर्व गुंड अगदी उजळ माथ्याने तेथून निघून गेले. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने दोन्ही जखमींना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी रात्री उशिराने सदर विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी अनिकेत दळे, अनिकेत मंडलिक व एका अल्पवयीन (नाव निष्पन्न) मुलासह अन्य अज्ञात चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307, विनयभंग केल्याचे कलम 354 अ. सह भा.द.वी.च्या 341, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे वरील सर्वावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक निकिता महाले करीत असून वृत्तलिहेपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नव्हते.

सदरची घटना सतत गजबजलेला आणि नागरिकांचा वावर असलेल्या साई मंदिराशेजारील ओहरा महाविद्यालयाजवळ घडली आहे. यातील आरोपींनी भर रस्त्यात त्या विद्यार्थीनीला अडविले, तिच्याशी गैरवर्तन केले, तिचे केस ओढून तिच्या मनात भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी धावलेल्यांवर चक्क चाकूने जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न झाला, इतक्या वर्दळीच्या शिक्षण मंदिरासमोर त्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाली. एवढं सगळं घडून कोणीही त्या गुंडांना धरण्याचा किंवा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अगदी उजळमाथ्याने ते तेथून निघून गेले व जातांना ‘अ‍ॅट्रॉसीटी’ दाखल करण्याचा दमही भरुन गेले. हे असेल प्रकार सुसंस्कृत म्हणविल्या जाणार्‍या संगमनेरसाठी पोषक नसल्याने पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अशा प्रवृत्ती वेळीच ठेचण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.


प्रदीर्घ अनिश्चिततेनंतर शाळा व महाविद्यालये सुरु झाल्याने त्या भोवता हेलपाटे मारणार्‍या रोडरोमिओंसह अशा प्रकारच्या विकृतांचाही वावर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने गस्त घालून शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणणार्‍या शहर पोलिसांनी आता आपल्या गस्तीची व्याप्ती वाढवून शाळा व महाविद्यालयाचे परिसरही विचारात घेतले पाहिजे व अशा ठिकाणी अनाधिकाराने वावरणार्‍यांना कायद्याचा धाकही दाखविला पाहिजे अशी स्थिती आता निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *