रेशीम शेतीतून तरुण शेतकर्याची आर्थिक क्रांती हिवरगाव आंबरेतील हरिभाऊ बोंबलेंची प्रयोगशील वाटचाल

महेश पगारे, अकोले
दिवसेंदिवस शेतीकडे बघण्याचा तरुणांचा दृष्टीकोन बदलत असताना अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील सुशिक्षित तरुण शेतकरी हरिभाऊ बोंबले यांनी पारंपारिक पिकांना फाटा देत रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. यात ते आधुनिकतेची जोड देऊन आणि प्रामाणिक कष्ट करुन यशस्वी झाले असून, आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांचा हा प्रवास इतर तरुण शेतकर्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

आढळा खोर्यातील अर्थकारणे बहुतांशी शेतीवरच अवलंबून आहे. यामुळे फळपिके आणि नगदी पिके करण्यावर येथील शेतकर्यांचा मोठा भर आहे. परंतु, पारंपारिक पिकांना फाटा देत नवीन पीक करण्याचा निर्णय सुशिक्षित तरुण शेतकरी हरिभाऊ बोंबले यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी अनेक रेशीम उत्पादक शेतकर्यांना प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घेतले. साधारण दीड वर्षांपूर्वी त्यांनी दीड एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून जमिनीची संपूर्ण मशागत केली.

लागवडीसाठी 35 हजार रुपयांच्या आसपास खर्च आला. त्यानंतर साडेतीन लाख रुपयांची शेड बांधली. मजुरी व मांडणीसाठी 50 हजारु रपये खर्च केला, असा सुरुवातीला साधारण 4 लाख 35 हजारांच्या आसपास खर्च केला. यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला स्वअभ्यास करुन शेतकरी बोंबले पहिला कोष तयार करण्यात यशस्वी झाले. लागवडीच्या तीन महिन्यानंतर रेशीम कोष तयार झाला, त्यास प्रतिकिलो 550 रुपयांचा भाव मिळाला.

एका वर्षात साधारण 850 किलोच्या आसपास कोष उत्पादन निघाले, त्यातून एकूण 4 लाख 62 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वगळता त्यांना 4 लाख 14 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. याची विक्री महाराष्ट्रातील जालना, बीड, बारामती बाजार समिती आणि कर्नाटकातील रामनगर येथे केली. यावरुन शेतीत हिंमतीने व आधुनिकतेची कास पकडून प्रयोग राबविल्यास नक्कीच यशस्वी होता येते याचा वस्तुपाठ तरुण शेतकरी हरिभाऊ बोंबले यांनी घालून दिल्याचे अधोरेखित होत आहे.

शेतकर्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणार्या पिकांकडे वळावे. तरुण शेतकर्यांनी शासन राबवत असलेल्या गटशेतीचा पुरेपूर फायदा घ्यावा. यासाठी चांगल्या पगाराच्या नोकरीची देखील गरज भासणार नाही.
– हरिभाऊ बोंबले (रेशीम उत्पादक)

शेतकर्यांनी रेशीम शेती मोठ्या प्रमाणात करावी. अतिशय किफायतशीर ही शेती असून, मार्केटिंगसाठी एकत्र यावे. यातून फायदा होऊन चांगले उत्पन्न मिळेल.
– माधव हासे (तालुका कृषी अधिकारी-अकोले)
